बालकामगार ठेवल्यास थेट गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 12:24 IST2019-11-11T12:24:27+5:302019-11-11T12:24:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बालकामगार प्रथा निमरुलनासाठी समाजातील प्रत्येक घटकांचा सहभाग आवश्यक असून जिल्ह्यातील धोकेदायक उद्योगांच्या ठिकाणी बाल ...

बालकामगार ठेवल्यास थेट गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बालकामगार प्रथा निमरुलनासाठी समाजातील प्रत्येक घटकांचा सहभाग आवश्यक असून जिल्ह्यातील धोकेदायक उद्योगांच्या ठिकाणी बाल कामगार आढळून आल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले.
जिल्ह्यात 7 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीमध्ये बाल कामगार प्रथेविरुध्द जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सरकारी कामगार अधिकारी किशोर जोशी, पोलीस उप अधीक्षक सिताराम गायकवाड, महिला व बाल कल्याण विभागाचे जाधव, दुकान निरिक्षक रमेश शेळके, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
जनजागृती मोहिम कालावधीत जिल्हा कार्यक्षेत्रातील बाल कामगार बहुलक्षेत्र निश्चित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विटभट्टी मालकांकडून बालकामगार न ठेवण्याबाबत हमीपत्र लिहून घेतले जाईल. हॉटेल असोसिएशन, व्यापारी संघटना यांच्या बैठका, चर्चासत्रे आयोजित करुन बाल कामगार अधिनियमाबाबत माहिती देण्यात येईल. मुख्य बाजारपेठ, मोठी गावे, नगरपालिका क्षेत्र याठिकाणी रॅलीचे आयोजन करणे, सार्वजनिक ठिकाणी स्वाक्षरी मोहिम राबविणे, स्टीकर प्रदर्शित करणे, सर्व विभागात सामुहिक शपथ घेणे, स्वयंसेवी संस्था, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या सहकार्याने अत्यअल्प उत्पन्न असलेल्या क्षेत्रामधील पालकांचे प्रबोधन करण्याचा उपक्रम देखील राबविण्यात येणार आहे. स्थानिक बोलीभाषेतून बालमजुरीच्या अनिष्ठ प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी प्रबोधन करण्यासह विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी दिले. सरकारी कामगार अधिकारी यांनी जिल्ह्यातील नागरिकांसाठी त्यांच्या कार्यालयात टोल फ्री क्रमांक कार्यान्वीत करुन त्यावर बालकामगार विषयी तक्रारी नोंदविण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन द्यावी. बाल कामगार अधिनियम कायद्यान्वये ज्या आस्थापनेमध्ये 14 वर्षाच्या आतील बालकामगार आढळून येईल अशा आस्थापनेविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सर्व संबंधित यंत्रणांनी आपआपसात समन्वय ठेवून मोहीम यशस्वी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.