डिझेलचे दर गगनाला भिडल्याने शेतीची मशागत करणे झाले महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:34 IST2021-02-09T04:34:12+5:302021-02-09T04:34:12+5:30
पूर्वी शेतीची कामे बैलांच्या मदतीने नांगरणी, वखरणी, पेरणी, कोळपणी अशी सर्व कामे केली जायची. यामध्ये कोणताही खर्च शेतकऱ्यांना ...

डिझेलचे दर गगनाला भिडल्याने शेतीची मशागत करणे झाले महाग
पूर्वी शेतीची कामे बैलांच्या मदतीने नांगरणी, वखरणी, पेरणी, कोळपणी अशी सर्व कामे केली जायची. यामध्ये कोणताही खर्च शेतकऱ्यांना येत नव्हता. घराच्या पुढे दावणीला बांधलेल्या बैलांनी कामे व्हायची. प्रत्येक शेतकरी आपल्या खुंट्याला बैल ठेवत असे. बैलांची जास्त संख्या असेल तर शेतकरी मोठा समजला जायचा आणि बैल नसेल तर तो शेतकरी नाही, असे समीकरण तयार झाले होते. बदलत्या काळानुसार यांत्रिकीकरण आले अन् शेतात बैलांऐवजी ट्रॅक्टर घुसला. मागील दशकापासून शेतीत आमूलाग्र बदल झाला. चार दिवसांची कामे एक तासात व्हायला लागली, एक पीक काढले की अवघ्या एक दिवसात मशागत करून दुसरे पीक उभे राहील अशी साधने निर्माण झाली. नांगरणी, कोळपणी, फवारणी, पीक वाहतूक करणे, रोटा फिरवून गवत कापणे अशी सर्व कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने होऊ लागली. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचाला, अंग मेहनत वाचली मात्र शेतीसाठी लागणारा खर्च वाढला. आज डिझेलचे दर गगनाला भिडले आणि व्यवसाय करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांनी कामांचे दर वाढवले, डिझेल महाग झाल्यामुळे येणारा पैसा त्यात खर्च होत असल्यामुळे चार पैसे शिल्लक रहावे म्हणून मशागतीचे दर वाढले आणि पर्यायाने शेतीचे उत्पादन आणि वाढता खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेती तोट्यात जाऊ लागली आहे. ट्रॅक्टरची मशागत शेतकऱ्यांना आज परवडणारी नसली तरी काळानुरूप बैलांच्या मदतीने शेती करणेही आज तरी माणसाला शक्य नाही. यासाठी शेतीला पुरविण्यात येणाऱ्या डिझेलवरील कर कमी करून शेतकऱ्यांना दिलासा देण गरजेचे आहे.
सद्य:स्थितीतील शेती मशागतीचे दर असे (प्रती एकर) : नांगरणी एक हजार ८०० रुपये, रोटा मारणे दोन हजार रुपये, फणणी एक हजार ६०० रुपये, वाफे तयार करणे एक हजार ६०० रुपये रन, सरी पाडणे एक हजार रुपये याप्रमाणे दर आहेत.
धावपळीच्या युगात शेतीची कामे लवकर व्हावी यासाठी ट्रॅक्टरला अवजारे जोडून शेतीची कामे केली जातात. आज जवळपास सर्व शेतकरी ट्रॅक्टरद्वारे शेती करतात. परंतु डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे मशागतीचेही दर वाढले आहेत. शेतीचे उत्पन्न आणि वाढता खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेती तोट्यात जात आहे. शासनाने शेतीच्या कामासाठी वापरत असलेल्या अवजारांना मिळणारे डिझेलचे भाव कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
-सुनील कोळी, शेतकरी, तोरखेडा, ता.शहादा
डिझेलचे दर वाढल्यामुळे ट्रॅक्टरने मशागत करावयाच्या कामाचे दर वाढवावे लागले. ट्रॅक्टरसाठी लागणारा खर्च आणि शिल्लक यांचा ताळमेळ बसत नसल्याने धंदा तोट्यात जाऊ लागला. कोणताही व्यवसाय तोट्यात करणे शक्य नाही म्हणून दर वाढले त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
-दीपक कुंभार, ट्रॅक्टर व्यावसायिक, तोरखेडा, ता.शहादा