Dialogue on politics and justice | राजकारण व न्यायदानावर साधला संवाद

राजकारण व न्यायदानावर साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आदिवासी भागासह शहरी भागातील विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी कायद्यासह भाषा, डिजीटलायझेशन, भ्रष्टाचार, न्यायदानातील विलंब या प्रश्नांवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत उत्तरे दिली. परिस्थितीचा बाऊ करू नका, शिक्षण घ्या पण व्यवहार ज्ञान देखील शिका असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना टेक्नोसॅव्ही होण्याचे आवाहन देखील केले.
नंदुरबार तालुका विधायक समिती संचालित विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते. खासदार डॉ. हिना गावित, राजभवनाचे प्रधान सचिव संतोष कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, जि.प.सीईओ विनय गौडा, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वसुमना पंत, बार कौन्सिलचे सदस्य जयंत जायभावे, संस्थेचे संचालक परवेझ खान, प्राचार्य एन.डी. चौधरी आदी उपस्थित होते. परवेझखान यांनी राज्यपालांचे संस्थेच्या वतीने स्मृतीचिन्ह देवून स्वागत केले.
रुची वळवीच्या प्रश्नाला उत्तर देताना कोश्यारी यांनी महिला अत्याचाराच्या घटना वेदनादायी आहेत. केवळ पोलिस दल त्या रोखू शकणार नाही. ही सामाजिक समस्या असल्याने सामाजिक जागृतीद्वारे या समस्येवर मात करता येईल. विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा. कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. दुर्गम भागात पोषणयुक्त आहार देण्यात येत आहे. काही कालावधीनंतर या समस्येवर मात करता येईल, असे धिरसिंग पाडवी याच्या प्रश्नास उत्तर देताना सांगितले. सायली इंदिसने भ्रष्टाचाराचा मुद्दा मांडल्यावर वकील झाल्यावर प्रामाणिकपणे काम करावे. स्वत: भ्रष्टाचार करणार नाही आणि इतरांना करू देणार नाही हा निश्चय करा, असे आवाहन केले. दानिश खाटीक याने लोकप्रतिनिधींच्या शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा मांडला. त्यावर राज्यपाल म्हणाले, राजकारणात सुशिक्षित प्रतिनिधी येत आहेत. परंतु राज्य घटनेनुसार समानतेचे तत्व स्वीकारले असल्याने सर्वांना समान संधी मिळणे अपेक्षित आहे. कबीर, तुलसीदास, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, तुकडोजी महाराज यांनी पारंपरिक शिक्षण घेतले नव्हते तरी त्यांनी महान कार्य केले. निरक्षर असूनही काही व्यक्ती उत्तम कामगिरी करू शकतात. शिक्षणाचा संबंध अंतरज्ञानाशी आहे, त्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा.
दीपक पराडके याच्या आॅनलाईनच्या मुद्याविषयी बोलताना वर्षभरात दुर्गम भागात इंटरनेट सुविधा उपलब्ध होईल. नव्या युगात अशा सुविधा दुर्गम भागात पोहोचणे आवश्यक आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. कीर्ती तडवीला आदिवासी जनजागृतीसाठी आपण स्वत: ग्रामीण भागात जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सागाळीची शेती उत्पाक कंपनी
राज्यपाल कोश्यारी यांनी सागाळी येथील नेसू परिसर शेती उत्पादक कंपनीच्या राईस मिलला भेट देऊन माहिती घेतली. स्थानिक उत्पादनाचा उपयोग करून राईस मिलचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करीत आहे. शेतीला पशुपालनाची जोड दिल्यास अधिक लाभ होईल. व्यसनापासून दूर रहात श्रमप्रतिष्ठेला महत्व देणे गरजेचे आहे. राईस मिल चालविताना येणाºया अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सहकार्य करण्यात येईल,असे त्यांनी सांगितले. अर्चना वळवी यांनी कंपनीच्या कार्याविषयी माहिती दिली. यानंतर राज्यपालांनी खांडबारा येथील रुग्णालयाला अचानक भेट दिली. त्यांनी रुग्णांशी चर्चा करताना मिळणाºया औषधोपचारविषयी माहिती घेतली.
नावली विद्यार्थ्यांशी संवाद
नावली आश्रमशाळेला भेट देऊन डिजिटल क्लासरूमची पाहणी केली. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत भोजन घेताना त्यांच्या शिक्षणाविषयी चर्चा केली. परतीच्या प्रवासात वाटेत नावली जिल्हा परिषद शाळेतील बालके दिसल्यावर त्यांनी वाहन थांबवून मुलांना चॉकलेट वाटले. मुलांशी संवाद साधला. शिक्षक सतिष देवरे व सुभाष कोकणी यांनी त्यांचे स्वागत केले.

चुनचुनीत विद्यार्थ्यांचे केले कौतूक...
नंदुरबार येथील एकलव्य मॉडेल रेसिडेंशिअल स्कुल येथे विद्यार्थ्यांशी देखील राज्यपालांनी संवाद साधला. यश संपादन करण्यासाठी जीवनाला दिशा हवी. विद्यार्थ्यांनी निश्चित उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल केल्यास यश हमखास मिळते. त्याला परिश्रमाची जोड आवश्यक असल्याने अध्ययनावर लक्ष केंद्रित करा व शालेय जीवनात मोबाईलपासून दूर रहा. आई, वडील आणि गुरुजनांविषयी आदरभाव बाळगा आणि शिक्षकांवर श्रद्धा असू द्या. विद्यार्थ्यांनी विद्यालयाची माहिती उत्तम रीतीने दिल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. एकलव्य विद्यालयाने अनेक पुरस्कार मिळविल्याबद्दल त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन केले.
४जळखे येथील आश्रमशाळेला भेट
राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी जळखे येथे डॉ.हेडगेवार सेवा समिती नंदुरबार संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेला भेट दिली. यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावित, आमदार राजेश गावित, आमदार शिरीषकुमार नाईक, संस्थेचे चेअरमन कृष्णदास पाटील, उपाध्यक्ष दात्र्यामामा पावरा, सचिव नितीन पंचांभाई आदी उपस्थित होते.
४विद्यार्थ्यांसोबत भोजन...
आदिवासी प्रकल्प कार्यालयातर्फे विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी सुरू असलेल्या सेंट्रल किचनला देखील राज्यपालांनी भेट देवून पहाणी केली. यावेळी तेथे शिजवलेल्या पदार्थांचीही त्यांनी विद्यार्थ्यांसोबत बसून चव चाखली.

योग्य नियोजनामुळे राज्यपाल समाधानी
४विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठीचा कार्यक्रम ३५ ते ४५ मिनिटांचा ठेवण्यात आला होता. विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि विधी क्षेत्रातील मान्यवरांना त्यासाठी निमंत्रीत करण्यात आले होते. नियोजन सुटसुटीत आणि आटोपशीर ठेवले होते. त्यामुळे राज्यपालांनीही समाधान व्यक्त केले. ज्येष्ठ विधितज्ज्ञ अ‍ॅड.राजेंद्र रघुवंशी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. परंतु ते उपस्थित राहू शकले नाहीत. विधी महाविद्यालयाचे प्राचार्य एन.डी.चौधरी, जीटीपीचे प्राचार्य महेंद्र रघुवंशी, पुष्पेंद्र रघुवंशी, श्रीवास्तव, आर.आर.कासार यांनी राजशिष्टाचाराप्रमाणे कार्यक्रम पार पाडला.

Web Title: Dialogue on politics and justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.