आमदारांच्या समितीसमोर निघाले आरोग्य विभागाच्या कामकाजाचे धिंडवडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:36 IST2021-09-08T04:36:43+5:302021-09-08T04:36:43+5:30
समितीच्या अध्यक्षा आमदार सरोज अहिरे, आमदार सुमन पाटील, आमदार यामिनी जाधव यांनी सोमवारी रात्री उशिरापर्यंत अक्कलकुवा तालुक्यात भेट दिली ...

आमदारांच्या समितीसमोर निघाले आरोग्य विभागाच्या कामकाजाचे धिंडवडे
समितीच्या अध्यक्षा आमदार सरोज अहिरे, आमदार सुमन पाटील, आमदार यामिनी जाधव यांनी सोमवारी रात्री उशिरापर्यंत अक्कलकुवा तालुक्यात भेट दिली होती.
समितीकडून तालुक्यात दिलेल्या भेटीदरम्यान आरोग्य केंद्रातील उपलब्ध औषधसाठ्याची पाहणी करत असताना एका कपाटात मुदत संपलेली ओआरएसची पाकिटे आढळली. काही औषधांची मुदत ही सप्टेंबर महिन्याच्या ३१ तारखेला संपणार असल्याचे दिसून आले. मुदत संपणाऱ्या औषधांचे पुढे काय करणार याबाबत विचारणा केली असता, आरोग्य विभागाकडून कोणतेही समर्पक उत्तरे देत न आल्याने नाराजी व्यक्त केली. अक्कलकुवा बसआगारातील हिरकणी कक्षही खूप दिवसांनंतर उघडून स्वच्छ करण्यात आल्याचे समोर आल्याने समितीने आगारप्रमुख रितेश फुलपगारे यांची कानउघाडणी केली.
दरम्यान, संध्याकाळी सात वाजेदरम्यान तालुक्यातील देवमोगरा पुनर्वसन येथील अंगणवाडी केंद्राला समितीने भेट दिली. यावेळी वीज नसल्याने संपूर्ण गावात अंधाराचे साम्राज्य होते. बॅटरीच्या प्रकाशात समितीने केंद्रात प्रवेश केला. वीज नसल्याने त्यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान, समितीने सकाळी नंदुरबार जिल्हा रुग्णालयालाही भेट दिली होती. भेटीदरम्यान रुग्णालयातील अस्वच्छता पाहून त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली गेली.