वाढत्या तापमानाने शेतशिवारे ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 12:02 IST2019-04-30T12:02:20+5:302019-04-30T12:02:43+5:30
ग्रामस्थ बेजार : ग्रामीण भागातील जनजीवनावर होतोय परिणाम

वाढत्या तापमानाने शेतशिवारे ओस
तळोदा : गेल्या काही दिवसांपासून दिवसागणिक तापमानात वाढ होत आहे़ याचा मोठ्या प्रमाणात परिणाम शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामकाजावर होताना दिसून येत आहे़ दुपारच्या वेळी चांगलेच तापत असल्याने शेतशिवारे ओस पडलेली दिसून येत आहेत़
गेल्या अनेक दिवसांपासून तापमानाचा पारा चाळीशीच्या खाली उतरण्याचे नाव घेत नाहीये़ त्यामुळे शेतकऱ्यांना दुपारच्या वेळी शेतात काम करणेही अवघड होऊन बसले आहे़ दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील जनजीवनही विस्कळीत झाले असल्याची स्थिती आहे़
सकाळी नऊ वाजेपासूनच तापायला सुरुवात होत असते़ परंतु दुपारी १२ वाजेपासून तर प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवत असतो़ त्यामुळे शेतातही शुकशुकाट दिसून येत आहे़ वाढत्या तापमानामुळे शेतात काम करण्याचीही इच्छा होत नसल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे़ शेतात पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून वाढत्या तापमानाचा जनावरांवरही मोठा परिणाम होताना दिसून येत आहे़ तापमानात झालेल्या वाढीमुळे जनावरेसुध्दा शेतात पूर्ण क्षमतेने काम करीत नसल्याची स्थिती आहे़ जनावरांसाठीही शेतकºयांकडून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे़ वातावरणात आद्रता वाढली असल्याने जीवाची लाही लाही करणाºया उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेक शेतकºयांना आपल्या शेतात निवाºयाचीही उभारणी केली आहे़ दुपारच्या वेळी याच निवाºयात शेतकºयांकडून काही काळ आराम करण्यात येत असतो़