कायदे असूनही महिला कामाच्या ठिकाणी लैंगिक छळास बळी पडतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:23 IST2021-06-06T04:23:07+5:302021-06-06T04:23:07+5:30
नंदुरबार : येथील विधी महाविद्यालयात "कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध" या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित केले होते. या ...

कायदे असूनही महिला कामाच्या ठिकाणी लैंगिक छळास बळी पडतात
नंदुरबार : येथील विधी महाविद्यालयात "कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध" या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित केले होते. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्पेन देशातील संटियागो विद्यापीठाच्या प्राध्यापिका व संयुक्त राष्ट्र संघाच्या मानव अधिकारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रा. डॉ. अँटोनिट्टा एलिया उपस्थित होत्या. त्यांनी कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध संबंधित आंतरराष्ट्रीय कायदे व दृष्टिकोन याविषयी मार्गदर्शन केले. जगात प्रत्येक देशात महिलांच्या सुरक्षेसंदर्भात कायदे असूनदेखील हजारो महिला लैंगिक अत्याचारास बळी पडत असतात. लैंगिक अत्याचाराचे प्रमाण मागासलेल्या देशांमध्ये अधिक असल्याचे मत त्यांनी मांडले. दुसरे तज्ज्ञ मार्गदर्शक या मणिपाल युनिव्हर्सिटी जयपूरच्या प्राध्यापिका डॉ. विजयलक्ष्मी शर्मा होत्या. त्यांनी भारतात महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा २०१३ विषयी सखोल मार्गदर्शन केले. लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा लागू होऊन आठ वर्षे झाली मात्र आजही बहुतांश काम करणाऱ्या महिलांना त्यांना असलेल्या संरक्षणाबद्दल माहिती नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सदर उपक्रम महाविद्यालयाचे अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्षाचे समन्वयक डॉ. एस. एस. हासानी यांनी प्राचार्य प्रा. डॉ. एन. डी. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता. लसीकरण जनजागृती स्पर्धा
महाविद्यालयातर्फे जनजागृती होण्याच्या दृष्टीने कोविड लसीकरणाविषयी जनजागृती प्रश्नावली स्पर्धा ऑनलाइन आयोजित केली होती. ज्यामध्ये ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रश्नोत्तराची रचना ही विद्यार्थी आणि समाजात लसीकरणाची जागृती निर्माण व्हावी तसेच त्यांनी इतर नागरिकांना लसीकरण होण्यास प्रोत्साहित करावे या दृष्टीने तयार करण्यात आली होती. संस्थेचे अध्यक्ष मनोज रघुवंशी व उपाध्यक्ष अॅड. राजेंद्र रघुवंशी, सचिव यशवंत पाटील यांनी उपक्रमासाठी प्रोत्साहन देऊन सहकार्य केले.