अपक्षांसह राजकीय पक्षांच्या उमेदवारांचीही डिपॉझिट जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 19:03 IST2019-04-20T19:03:10+5:302019-04-20T19:03:33+5:30
नंदुरबार : लोकसभा मतदारसंघात १९५१ ते २०१४ पर्यंतच्या निवडणुकीचा इतिहास पाहिला तर १६ सार्वत्रिक निवडणुकांपैकी १३ निवडणुकांमध्ये उमेदवारांची डिपॉझिट ...

अपक्षांसह राजकीय पक्षांच्या उमेदवारांचीही डिपॉझिट जप्त
नंदुरबार : लोकसभा मतदारसंघात १९५१ ते २०१४ पर्यंतच्या निवडणुकीचा इतिहास पाहिला तर १६ सार्वत्रिक निवडणुकांपैकी १३ निवडणुकांमध्ये उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली आहे. उर्वरित तीन निवडणुकांमध्ये सरळ लढती होत्या. १३ निवडणुकांमध्ये एकुण ४५ उमेदवारांच्या डिपॉझिट जप्त झाल्या आहेत.
निवडणूक अर्ज दाखल करतांना उमेदवारांना डिपॉझिट अर्थात अनामत रक्कम भरावी लागते. निवडणुक निकालानंतर जर उमेदवाराला एकुण वैध मतांच्या १६ टक्के मते मिळाली तर संबधीत उमेदवाराला त्याची अनामत रक्कम परत मिळते. त्यापेक्षा कमी मते मिळाली तर ती रक्कम शासन जमा होत असते. १९५१ पासून २०१४ पर्यंत एकुण १६ निवडणुका झाल्या आहेत. १६ पैकी तीन निवडणुकांमध्ये सरळ लढत होती. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवारांच्या डिपॉझिट जप्त होण्याचा संबंधच नव्हता. सर्वाधिक उमेदवार १९९१ व २०१४ च्या निवडणुकीत होते. दोन्ही निवडणुकांमध्ये एकुण नऊ उमेदवार होते. दोन्ही निवडणुकांमध्ये प्रत्येकी सात उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. पहिल्याच अर्थात १९५१ च्या निवडणुकीत सर्वाधिक सहा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्यावेळी दोन उमेदवार निवडून द्यावयाचे होते. यावेळी प्रमुख दोन उमेदवारांच्या विरोधातील दोन्ही प्रमुख उमेदवारांना वैध मतांच्या १६ टक्केपेक्षा कमी मते मिळाली होती. त्यांच्यासह इतर चार उमेदवारांचीही तीच स्थिती होती. त्यामुळे सहा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. यंदाच्या निवडणुकीत आतापर्यंतचे सर्वाधिक उमेदवार अर्थात ११ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात पाच अपक्ष आणि तीन राष्टÑीय पक्षांचे तर तीन नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत.