कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे काम नियोजित जागेवर सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST2021-06-30T04:20:19+5:302021-06-30T04:20:19+5:30
निवेदनात नवापूर येथे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या जागेवर काही नागरिकांनी दुकाने थाटून अतिक्रमण केले असून, या अतिक्रमणधारकांनी शाळेचे बांधकाम ...

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे काम नियोजित जागेवर सुरू करण्याची मागणी
निवेदनात नवापूर येथे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या जागेवर काही नागरिकांनी दुकाने थाटून अतिक्रमण केले असून, या अतिक्रमणधारकांनी शाळेचे बांधकाम बंद पाडले आहे. राज्यात बारा अतिमागास जिल्ह्यांमधील मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी मानव मिशनची स्थापना झाली आहे. त्यात नंदुरबार जिल्ह्याचाही समावेश असून, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके विमुक्त, इतर मागासवर्गीय व अल्पसंख्याक यापैकी दारिद्र्यरेषेखालील एक पालकत्व शाळाबाह्य दिव्यांग सिकलसेलग्रस्त स्थलांतरित व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ही शाळा आहे.
सदर शाळेत सहावी ते आठवी, नववी ते दहावी वर्ग मानव विकास मिशन केंद्र व राज्य शासन प्रकल्पग्रस्त अंतर्गत जिल्ह्यातील सहा तालुक्यात कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय मुलींसाठी सुरू असून, त्यापैकी पाच तालुक्यात निवासी शाळांची बांधकामे झालेली आहेत. नवापूर तालुक्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, नवापूर शहरापासून दूर वाकीपाडा गावात भाड्याच्या घरात गुजरातच्या सीमेवर सुरू आहे. त्यामुळे जुन्या सरकारी दवाखान्याची जागा सर्व्हे क्रमांक १४० क्षेत्रफळ ३८३७.९० चौरस मीटर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत बालिका विद्यालय बांधकामासाठी शासनाचे अनुदान मंजूर आहे.
शाळेच्या जागेवर ठेकेदाराने बांधकामाला सुरुवातदेखील केली होती. मात्र अतिक्रमणधारकांनी शाळेचे बांधकाम बंद पाडले आहे. त्यामुळे गरीब मुली शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. यासाठी अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून शाळेचे बांधकाम त्वरित सुरू करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भारतीय ट्रायबल पार्टीचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष के.टी. गावीत यांनी निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष राहुल गावीत, सचिव आनंद गावीत, खजिनदार अमरसिंग गावीत, किरण गावीत, महादू गावीत, ओहरण गावीत यांच्या सह्या आहेत.