दुर्गम भागात बससेवा सुरु करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:31 IST2021-09-03T04:31:12+5:302021-09-03T04:31:12+5:30

कोरोना काळात मोलगी परिसरातील एस.टी. बसेस बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मोलगी व अककलकुवा येथे दैनंदिन बाजारासह शासकीय कार्यालयामध्ये ...

Demand to start bus service in remote areas | दुर्गम भागात बससेवा सुरु करण्याची मागणी

दुर्गम भागात बससेवा सुरु करण्याची मागणी

कोरोना काळात मोलगी परिसरातील एस.टी. बसेस बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मोलगी व अककलकुवा येथे दैनंदिन बाजारासह शासकीय कार्यालयामध्ये कामकाज व इतर कामासाठी नागरिकांना यावे लागते. मात्र एस.टी. बसेस बंद असल्याने गैरसोयीचे व त्रासदायक झाले आहे. आमलीबारी, देवगोई, डाब, मोलगी, जमाना, धडगाव, भगदरी, पिपळखुटा, वडफळी या परिसरात बससेवा अद्यापही बंद आहे. अक्कलकुवा-आमलीबारी, देवगोई-डाब या घाट सेक्शन रस्त्याच्या कामामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होता. त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या बसेस बंद होत्या. मात्र आता आमलीबारी ते देवगोई-डाब या रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे असून किरकोळ कामे सुरू आहेत. मोठी वाहनेही या मार्गावर सुरू झाली आहेत. त्यामुळे अक्कलकुवा आगारातून अक्कलकुवा, आमलीबारी, देवगोई, डाब, मोलगी, जमाना, धडगाव ,भगदरी, पिपळखुटा, वडफळी या मार्गावरील एस.टी. बसेस सुरू करणे गरजेचे झाले आहे. शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात वेळेवर पोहोचण्यासाठी एस.टी. बस सोयीची ठरते.

अक्कलकुवा आगारातून नंदुरबार, तळोदाच्या फेऱ्या वाढविण्याची गरज असून या मार्गावर प्रवाशी एस.टी. बसची तसन्तास प्रतीक्षा करतात. मात्र वेळेवर बस मिळत नसल्याने नाईलाजाने इतर खाजगी वाहनांद्वारे जास्त पैसे देऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे नंदुरबार व तळोदाच्या फेऱ्या वाढविण्याची गरज आहे. अक्कलकुवा आगारातून आमलीबारी-देवगोई डाबमार्गे मोलगी, जमाना, धडगाव एस.टी. बस सुरू करावी. घाट सेक्शनच्या चढाव मार्गावर मिनी बस सुरू केल्यास प्रवाशांना सोयीचे होईल, असे नागेश पाडवी यांनी निवेदनात म्हटले आहे.

सकाळी सहा वाजता अक्कलकुवा-डाब मोलगीमार्गे धडगांव, साडेआठ वाजता भगदरी, सकाळी नऊ वाजता अक्कलकुवा-डाब जमानामार्गे, १० वाजता अक्कलकुवा मोलगीमार्गे पिपळखुटा, दुपारी चार वाजता अक्कलकुवा-मोलगी पिपळखुटामार्गे वडफळी, धडगाव येथून दुपारी चार वाजता मोलगी, अक्कलकुवा-नंदुरबार बस सुरू करावी. शिक्षक, आरोग्य विभाग व इतर विभागात नोकरीसाठी ये-जा करणाऱ्यांना साडेपाच वाजेनंतर अक्कलकुवा येथून नंदुरबारला जाण्यासाठी बस नसल्याने गैरसोयीचे होते. त्यामुळे सायंकाळी सहा वाजता अक्कलकुवा-नंदुरबार बस सुरू करण्याची गरज आहे.

Web Title: Demand to start bus service in remote areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.