बबनशाहनगरातील समस्या सोडविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:28 IST2021-07-26T04:28:13+5:302021-07-26T04:28:13+5:30

बबनशाहनगरातील रहिवासी महिला व पुरुषांनी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालिकेचे गटप्रमुख प्रा. मकरंद पाटील यांना प्रत्यक्ष वसाहतीत निमंत्रित केले होते. ...

Demand to solve the problem in Babanshahnagar | बबनशाहनगरातील समस्या सोडविण्याची मागणी

बबनशाहनगरातील समस्या सोडविण्याची मागणी

बबनशाहनगरातील रहिवासी महिला व पुरुषांनी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालिकेचे गटप्रमुख प्रा. मकरंद पाटील यांना प्रत्यक्ष वसाहतीत निमंत्रित केले होते. प्रा. पाटील यांनी तेथे जाऊन पाहणी केली व रहिवाशांशी चर्चा केली. बबनशाहनगरातील रस्ता व गटारांचा प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेमार्फत प्रयत्न करणार असल्याचे यावेळी प्रा. पाटील यांनी उपस्थित नासीरखान पठाण, फरीदखान पठाण, हिरालाल अहिरे, मुश्ताकखान पठाण व उपस्थित नागरिकांना सांगितले. स्थानिक नागरिकांनी पालिकेचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच जिल्हाधिका-यांकडेही निवेदन दिले असल्याचे यावेळी सांगितले. बबनशहानगर परिसरातील रहिवाशांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या ५ वर्षांपासून आमच्या परिसरात अनेक मूलभूत सुविधांचा अभाव आहे. या परिसरात गटारे नाहीत, त्यामुळे सांडपाणी एकमेकांच्या अंगणात वाहून जाते व त्यावरून सतत लहान-मोठ्या भानगडी उद्‌भवतात. पक्के रस्ते नसल्याने पावसाळ्यात येथून मार्ग काढणे जिकिरीचे होते. गटारी नसल्याने व पाण्याच्या निचऱ्याचा मार्ग नसल्याने नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरते. परिसरात डबके साचल्यामुळे डास-मच्छरांची उत्पत्ती वाढून साथीचे रोग पसरत आहेत. मूलभूत सुविधांपासून या परिसरातील नागरिक वंचित असून या सुविधा उपलब्ध करून देणे हे नगरपालिकेचे कर्तव्य आहे. इतर भागांत बऱ्याच सुविधा आहेत. मात्र, बबनशाहनगरसाठी निधी नसल्याचे कारण सांगून दुजाभाव केला जात आहे. या मागण्यांसाठी शहादा नगरपालिकेत अनेक लेखी अर्ज केले. तोंडी जाऊन मुख्याधिकाऱ्यांना व संबंधित नगरसेवकांना विनंत्या केल्या. मात्र, कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे रहिवाशांमध्ये संताप आहे. वारंवार मागणी करूनही नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. म्हणून या मूलभूत सुविधा न पुरविल्यास नाइलाजाने सनदशीर मार्गाने आंदोलन, उपोषण आदी मार्ग अवलंबावे लागेल. त्यामुळे होणाऱ्या परिणामांची जबाबदारी प्रशासनाची राहील. निवेदनाच्या प्रती नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी शहादा नगरपालिका, तहसीलदार शहादा, पोलीस निरीक्षक शहादा यांना देण्यात आल्या आहेत. निवेदनावर सुमारे १५ रहिवाशांच्या स्वाक्षरी आहेत.

Web Title: Demand to solve the problem in Babanshahnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.