जयनगर ते लोंढरे रस्ता दुरुस्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:20 IST2021-06-27T04:20:25+5:302021-06-27T04:20:25+5:30
जयनगर ते लोंढरे रस्त्याचे अंतर सहा किलोमीटर अंतर असून या दोन गावांमध्ये धांद्रे हे गाव येते. जयनगरहून लोंढरेमार्गे मध्य ...

जयनगर ते लोंढरे रस्ता दुरुस्तीची मागणी
जयनगर ते लोंढरे रस्त्याचे अंतर सहा किलोमीटर अंतर असून या दोन गावांमध्ये धांद्रे हे गाव येते. जयनगरहून लोंढरेमार्गे मध्य प्रदेशात जाण्यासाठी शॉर्टकट रस्ता आहे. या मार्गावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. तोरखेडा, बामखेडा, कुकावल, वडाळी तसेच शिरपूरहून मध्य प्रदेशकडे जाणारी सगळी वाहने शहादामार्गे न जाता जयनगर ते लोंढरेमार्गे मध्य प्रदेशात जातात. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघातही होत आहेत. त्यामुळे निदान खड्ड्यांमध्ये मुरूम तरी टाकावा, अशी अपेक्षा वाहनधारक व्यक्त करीत आहेत.
आता पावसाळा सुरू झाला असून खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे वाहन आदळून अपघात होत आहेत. जयनगर, धांद्रे, लोंढरे परिसरातील शेतकरी शेतीकामात बैलगाडीचा वापर रासायनिक खते तसेच मजूर पोहोचवण्यासाठी करतात, म्हणून त्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. मागील वर्षीही या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी ग्रामस्थ व वाहनधारकांनी केली होती. मात्र संबंधित बांधकाम विभागाने तेव्हाही दुर्लक्ष केले होते. यंदा तरी या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.