जयनगर गावाबाहेरून मध्यप्रदेशकडे जाणारा बायपास रस्ता दुरुस्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:21 IST2021-06-10T04:21:20+5:302021-06-10T04:21:20+5:30

गेल्या दहा ते बारा वर्षांपूर्वी जयनगर गावाला वळसा घालून तयार करण्यात आलेला बायपास रस्ता अतिशय खराब झाला असून, या ...

Demand for repair of bypass road from Jayanagar village to Madhya Pradesh | जयनगर गावाबाहेरून मध्यप्रदेशकडे जाणारा बायपास रस्ता दुरुस्तीची मागणी

जयनगर गावाबाहेरून मध्यप्रदेशकडे जाणारा बायपास रस्ता दुरुस्तीची मागणी

गेल्या दहा ते बारा वर्षांपूर्वी जयनगर गावाला वळसा घालून तयार करण्यात आलेला बायपास रस्ता अतिशय खराब झाला असून, या रस्त्याची पूर्ण चाळण झाली आहे. बायपास रस्ता खराब झाल्यामुळे मध्यप्रदेशकडे जाणारी वाहने जयनगर गावातून जात असतात. सर्व वाहने जयनगर गावातून तयार करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्याचा वापर करीत आहेत. हा रस्ता नवीनच असल्यामुळे वाहनधारक खूप वेगाने आपले वाहन चालवीत असतात. त्यामुळे येथे बऱ्याचदा अपघातही झाले आहेत. मध्यप्रदेशकडे जाण्यासाठी शिरपूरकडून येणारी वाहने शहादामार्गे न जाता जयनगरमार्गे जात असतात. मग यामध्ये दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहने असतील अथवा अवजड वाहने ही बायपास रस्ता अतिशय खराब असल्यामुळे जयनगर गावातून जाणाऱ्या काँक्रीट रस्त्याचा वापर करीत आहेत. गेल्या वर्षी हा बायपास रस्ता दुरुस्त केला होता. मात्र, हा रस्ता पुन्हा खराब झाला असून, या रस्त्यावर खड्डे पडले आहेत.

शिरपूर तालुक्यातील अनेक गावे तसेच शहादा तालुक्यातील तोरखेडा, बामखेडा, वडाळी, कुकावल, कोठली, बोराळे, फेस या गावांमधील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करीत असतात. या परिसरातील शेतकरी ट्रॅक्टरच्या साह्याने अथवा ट्रकच्या साह्याने आपला ऊस मध्यप्रदेश येथील पानसेमलजवळील दुर्गा खानसरी येथे घेऊन जात असतात. हे वाहनधारक शहादामार्गे न जाता जयनगरमार्गे जात असल्यामुळे जयनगर, लोंढरे असलोद - मंदाणेमार्गे आपला ऊस पानसेमलजवळील दुर्गा खानसरी येथे घेऊन जात असतात. मे महिन्यात ऊस निघाल्यावर खूप मोठ्या प्रमाणावर उसाच्या वाहनांची वर्दळ जयनगरमार्गे चालूच असते. वाहनधारक ही जयनगर गावाच्या बाहेरील दत्त मंदिर ते भवानी मातेच्या मंदिरादरम्यान तयार करण्यात आलेला बायपास रस्ता खराब असल्यामुळे या रस्त्याचा वापर करण्याऐवजी जयनगर गावामधून तयार करण्यात आलेला नवीन काँक्रीट रस्त्याचा वापर करीत असतात. गावातील काँक्रीट रस्त्यावर लहान मुले तसेच ग्रामस्थांची ये-जा चालूच असते. त्यामुळे छोटे अपघात होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गावातून मोठी वाहने गेल्यावर समोरून मोठे वाहन आल्यास क्रॉसिंग करण्याच्या वेळेस वाहनचालकांना खूप कसरत करावी लागते. तसेच उसाच्या ट्रॅक्टरमुळे जयनगर गावातील विजेच्या तारांना स्पर्श झाल्यामुळे तारा तुटणे, शॉर्टसर्किट होणे असे प्रकार बऱ्याचदा झाले आहेत.

जयनगर गावातून वाहने जात असल्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरांना खूप मोठ्या प्रमाणावर धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय, वाहनधारक खूप वेगाने वाहन घेऊन जात असल्यामुळे कुटुंबातील एका व्यक्तीला अपघात होऊ नये, म्हणून मुलांकडे नेहमी लक्ष द्यावे लागत असते. हा सगळा त्रास पाहता जयनगर गावाच्या बाहेरून तयार करण्यात आलेला बायपास रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन त्वरित दुरुस्त करायला हवा, अशी मागणी महात्मा फुले युवा मंचच्या वतीने करण्यात आली आहे.

जयनगर गावाच्या बाहेरून तयार करण्यात आलेल्या बायपास रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, मध्यप्रदेशकडे जाणारी वाहने या रस्त्याचा वापर करीत नाहीत. त्यामुळे ही वाहने जयनगर गावामधील काँक्रीट रस्त्याचा वापर करीत असतात. वेगाने वाहन चालविल्यामुळे या रस्त्यावर अनेकदा अपघातही झाले आहेत. म्हणून भविष्यात मोठा अपघात होऊ नये, म्हणून बायपास रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा.

- ईश्वर माळी, संस्थापक अध्यक्ष- महात्मा फुले युवा मंच

Web Title: Demand for repair of bypass road from Jayanagar village to Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.