नवापूर तालुक्यातील २१६ गटप्रेरिकांना मानधन देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:30 IST2021-09-11T04:30:59+5:302021-09-11T04:30:59+5:30
विधिमंडळ सचिवालयाची समिती नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आली असताना बीटीपीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात, नंदुरबार ...

नवापूर तालुक्यातील २१६ गटप्रेरिकांना मानधन देण्याची मागणी
विधिमंडळ सचिवालयाची समिती नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आली असताना बीटीपीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात, नंदुरबार जिल्हा परिषदेंतर्गत इतर तालुक्यातील उमेद च्या गटप्रेरिकांना मानधन मिळाले आहे; परंतु नवापूर तालुक्यातील उमेदच्या २१६ गट प्रेरकांना मागील २२ महिन्यांचे थकीत मानधन जिल्हा परिषदेच्या गचाळ कारभारामुळे अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे गटप्रेरिकांची उपासमार होत आहे.
काही गटप्रेरिका विधवा, परित्यक्ता, भूमिहीन व प्रकल्पग्रस्त आहेत. त्यांना मानधन मिळण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप मानधन मिळालेले नाही. जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या पत्रव्यवहारानुसार शासनाने अनुदान न पाठवल्यामुळे मानधन देऊ शकत नसल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान पालकमंत्र्यांशी चर्चा करूनही मानधन मिळू शकले नाही. त्यामुळे गटप्रेरिकांना मानधन देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी भारतीय ट्रायबल पार्टीचे जिल्हाध्यक्ष के.टी. गावित, नवापूर तालुका अध्यक्ष राहुल गावित, किरण गावित, आनंद गावित, अमरसिंग गावित आदी उपस्थित होते.