नंदुरबार तालुक्यात पंचनाम्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:32 IST2021-05-27T04:32:32+5:302021-05-27T04:32:32+5:30
नंदुरबार : तालुक्याच्या काही भागात गेल्या आठवड्यात बेमोसमी पाऊस आणि वारे यामुळे शेतशिवारातील शेड तसेच इतर साहित्याचे नुकसान झाले ...

नंदुरबार तालुक्यात पंचनाम्यांची मागणी
नंदुरबार : तालुक्याच्या काही भागात गेल्या आठवड्यात बेमोसमी पाऊस आणि वारे यामुळे शेतशिवारातील शेड तसेच इतर साहित्याचे नुकसान झाले आहे. याचा आढावा घेत नंदुरबार तालुका प्रशासनाने कार्यवाही करण्याची मागणी आहे. पंचनामे झाल्यास शेतकरी भरपाईला पात्र ठरणार आहे. यंदा लाॅकडाऊनमुळे शेतकरी आर्थिक संकटात आहेत.
दुरुस्ती कारागिरांना मिळताेय रोजगार
नंदुरबार : लाॅकडाऊनमध्ये घरगुती इलेक्ट्रीक वस्तू दुरुस्ती करणारी दुकाने बंद आहेत. या पार्श्वभूमीवर येथे काम करणारे कारागिर बेरोजगार झाले होते. परंतू गेल्या आठ दिवसात कारागिर सकाळी ओळखीच्या वसाहतींमध्ये फिरुन दुरुस्त्या करत रोजगार कमावत आहेत.
भाजीपाला आवक वाढली
नंदुरबार : बाजारात हिरव्या भाजीपाल्याची आवक पुन्हा वाढली आहे. बुधवारी फ्लावर, पाणकोबी, पालक, दुधी यासह विविध प्रकारचा भाजीपाला मुबलक प्रमाणात दिसून आला. यातही लिंबूची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याने अत्यंत कमी दरात त्यांची विक्री सुरु झाली होती. जिल्ह्यातील विविध भागातून नंदुरबार बाजार समितीत सध्या भाजीपाला लिलाव सुरु असल्याने ही आवक सुरु आहे.
अवैध व्यवसाय सुरु
नंदुरबार : तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध मद्यविक्रीसह गुटका विक्री सुरु आहे. याकडे पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. गुजरात हद्दीलगतच्या गावांमधून गुटका तस्करी वाढली असल्याचे दिसून आले आहे. हा गुटका शहरी भागात विक्री होतो.
व्यापा-यांची तयारी
तळोदा : कोरोनाचा संसर्ग कमी झाला असल्याने लाॅकडाऊनमधून इतर व्यवसायांना शिथिलता मिळण्याचे संकेत आहेत. या पार्श्वभूूमीवर व्यापारी स्वत:सह दुकानात कामाला असलेल्या कामगारांच्या चाचण्या करुन घेत आहेत. तसेच साफसफाईची कामेही हाती घेण्यात आली आहेत.
ग्रामीण हद्दीतील रस्ते दुरुस्तीची मागणी
नंदुरबार : शहरालगतच्या होळ तर्फे हवेली, पातोंडा आणि वाघोदा शिवारात रहिवासी वसाहती आहेत. ग्रामपंचायतींच्या हद्दीत असलेल्या या वसाहतींमधील रस्ते हे नावालाच आहेत. पावसाळ्यापूर्वी वसाहतींमध्ये रस्ते निर्मिती करुन नागरीकांना दिलासा देण्याची अपेक्षा आहे. वर्षानुवर्षे येथे राहणारे नागरीक ग्रामपंचायतींमध्ये वेळेवर घरपट्टी आणि पाणीपट्टी भरुनही कार्यवाही होत नसल्याने नाराजी आहे.
पथदिवे दुरुस्त करा
धडगाव : पावसाळ्यास येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे. यामुळे तालुक्यात वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढणार आहे. यामुळे तालुक्यातील विविध भागात लावलेले साैर पथदिवे आणि हायमस्ट दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. यामुळे सर्पदंशाचा धोका कमी होणार आहे.
टरबूजाचे दर घसरले
नंदुरबार : तालुक्यातील विविध भागात यंदा टरबूजाचे भरमसाठ उत्पादन आले आहे. यातून व्यापारी खरेदीसाठी येत नसल्याने शेतकरी मजूरांना लावून टरबूज विक्री करत आहेत. नंदुरबार शहरातील विविध भागात अत्यंत अल्पदरात मोठमोठे टरबूज विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
नालेसफाई करा
अक्कलकुवा : शहरातील विविध भागात पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्याची मागणी होत आहे. अक्कलकुवा शहरात नालेसफाईची कामे रखडली आहेत. यातून सांडपाणी साचून डासांचा प्रादुर्भाव होत आहे. नालेसफाई झालेली नसल्याने सांडपाणी रस्त्यांवरुन वाहत आहे.
जनजागृतीची गरज
अक्कलकुवा : तालुक्याच्या दुर्गम भागात अद्यापही लसीकरणाचा टक्का वाढलेला नाही. गेल्या आठ दिवसात या भागात लसीकरणाचे आकडे हे कमीच आहेत. या पार्श्वभूमीवर या भागात जनजागृती वाढवण्याची मागणी असून यासाठी सोंगाड्या पार्ट्यांना पाचारण करण्याची अपेक्षा होत आहे.