पाटबारा येथील उदय नदीवरील पूल बांधण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:21 IST2021-06-24T04:21:34+5:302021-06-24T04:21:34+5:30
सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील व अक्कलकुवा तालुक्यातील ओरपा ते धडगाव तालुक्यातील पाटबारादरम्यान उदय नदीवर पुलाचे बांधकाम १२ वर्षांपूर्वी सुरू करण्यात ...

पाटबारा येथील उदय नदीवरील पूल बांधण्याची मागणी
सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील व अक्कलकुवा तालुक्यातील ओरपा ते धडगाव तालुक्यातील पाटबारादरम्यान उदय नदीवर पुलाचे बांधकाम १२ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. परंतु कालांतराने हे बांधकाम बंद पडले आहे. १० वर्षांपासून बंद असलेल्या या बांधकामाची पूर्तता करण्याची कारवाई झालेली नाही. परिणामी दुर्गम भागातील पाडली, रणसुमा, पाटामुंड, टावरपाडा, मौलीगाणपाडा, शेलकुदपाडा, आवलीबारपाडा, नयर्याफरीपाडा, कोतवालपाडा, पाटीलपाडा व नेंदवान खुर्द नागरिकांना अडचणीचे ठरत आहे. नदीवर पूल नसल्याने वाहने नदीत टाकून पुढे जावे लागत असल्याने गैरसोयीचे ठरत आहे. पावसाळ्यात नदीच्या पात्रातून प्रवास करणे अत्यंत धोकादायक ठरत आहे. यातून अपघातही घडले आहेत. सोमवारी रात्री चारचाकी वाहन या मार्गाने जात असताना चालकाला अंदाज न आल्याने गाळात फसले. यातून पुरामध्ये अडकल्याने वाहन वाहून गेल्याचा प्रकार घडला. यात जीवितहानी झालेली नसली, तरी संबंधित विभाग जीवितहानीची वाट बघत असावा किंवा कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी आहे. तसेच प्रशासनाने हा पूल तातडीने बांधून देण्याची मागणीही जोर धरत आहे.