प्रकाशा येथे आधार कार्ड केंद्र देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:59 IST2021-03-04T04:59:48+5:302021-03-04T04:59:48+5:30
कधी लाइट राहत नाही तर कधी सर्व्हर डाऊन असतं अशा असंख्य अडचणी येतात म्हणून त्या सर्व गोष्टींचा विचार करून ...

प्रकाशा येथे आधार कार्ड केंद्र देण्याची मागणी
कधी लाइट राहत नाही तर कधी सर्व्हर डाऊन असतं अशा असंख्य अडचणी येतात म्हणून त्या सर्व गोष्टींचा विचार करून प्रकाशा येथे एक केंद्र द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
शहादा तालुक्यातील प्रकाशा हे जास्त लोकवस्तीचे गाव असून, गावांमध्ये जिल्हा परिषद मुलांची प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद मुलींची कन्या शाळा, जिल्हा परिषद उर्दू शाळा, खासगी प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, रामनगर, श्यामनगर शाळा, इंग्लिश मीडियम या शाळांच्या विद्यार्थ्यांना कार्डवरील दुरुस्तीसाठी शहादा येथे हेलपाटे मारावे लागत आहेत. शिवाय गावातील नागरिकांना आधार कार्डवरील दुरुस्तीसाठी शहादा येथे कार्यालयात जावे लागते.
विद्यार्थ्यांची आधार कार्डवरील सर्व माहिती बरोबर असणे गरजेचे असल्याने त्याशिवाय नोंदणी होत नाही. नागरिकांना नवीन आधार कार्ड काढण्याकरिता किंवा आधार कार्डवरील दुरुस्तीत नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाइल अपडेट अशा असंख्य चुका असतात. विविध योजनांकरिता दुरुस्ती करणे गरजेचे असल्याने आता शाळेत सरल डाटावर माहिती भरण्यासाठी विद्यार्थ्यांना आधार कार्डवरील दुरुस्ती आवश्यक आहे. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांना व पालकांना शहादा येथे जाऊन फॉर्म आणावा लागत असून, त्यावर गावातील सरपंच व शाळेतील मुख्याध्यापकांच्या सह्या झाल्यानंतर पुन्हा शहादा येथे जाऊन फॉर्म जमा करावा लागत आहे. या कामासाठी पालकांना तीन ते चार वेळा शहादा येथे वारंवार हेलपाटे मारावे लागत असून, कोरोना महामारीत जीव धोक्यात घालून बसने प्रवास करावा लागत आहे. शिवाय पैसा, वेळही वाया जात असल्याने पालकांकडून संताप व्यक्त आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या समस्येची दखल घेऊन प्रकाशा येथे आधार केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.
विद्यार्थ्यांची व पालकांची गैरसोय होत असेल तर दखल घेऊन शहादा येथून एक युनिट तात्पुरत्या स्वरूपात विद्यार्थी व नागरिकांसाठी प्रकाशा येथे पाठवू शकतो.
चेतन गिरासे, प्रांत अधिकारी, शहादा