केंद्राच्या निर्देशाने दोन दिवसांत मिळणार ‘डिलिव्हरी बाॅईज’ला लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:23 IST2021-06-01T04:23:15+5:302021-06-01T04:23:15+5:30
नंदुरबार : घरगुती गॅस सिलिंडर वितरण एजन्सींना ‘अत्यावश्यक सेवे’चा दर्जा देण्यात असल्याने लाॅकडाऊन काळातही ही सेवा सुरू होती. ...

केंद्राच्या निर्देशाने दोन दिवसांत मिळणार ‘डिलिव्हरी बाॅईज’ला लस
नंदुरबार : घरगुती गॅस सिलिंडर वितरण एजन्सींना ‘अत्यावश्यक सेवे’चा दर्जा देण्यात असल्याने लाॅकडाऊन काळातही ही सेवा सुरू होती. दरम्यान, या एजन्सीकडून गॅस सिलिंडर घरोघरी पाेहोचते करणाऱ्या कर्मचारीवर्गाच्या लसीकरणाचे काय, असा प्रश्न होता. यावर मार्ग काढत केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा दिला असल्याने त्यांचे लसीकरण येत्या दोन दिवसांत सुरू होणार आहे.
नंदुरबार शहरात एकूण चार एजन्सींद्वारे गॅस सिलिंडर ग्राहकांपर्यंत पोहोचते केल्या जातात. केवळ शहरच नव्हे तर तालुक्यातील गावांमध्येही हे सिलिंडर्स पोहोच करण्यात येतात. साधारण १ लाखांपेक्षा अधिक ग्राहकांपर्यंत जाणाऱ्या डिलिव्हरी बाॅईजच्या लसीकरणाबाबत उदासीन स्थिती होती; परंतु शासनाच्या आदेशानंतर चारही ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना लस मिळणार असून आरोग्य विभागाकडून नियोजन केले जाण्याची शक्यता आहे.
नंदुरबार शहरात चार गॅस एजन्सींमार्फत गॅसचा पुरवठा केला जातो. या चार एजन्सींकडे ६० कर्मचारी नियुक्त आहेत. त्यांच्याकडून सिलिंडर पोहोचते केले जाते. त्यातील एकही जण आजवर पाॅझिटिव्ह नसल्याची माहिती देण्यात येत आहे. दरम्यान, त्यातील ९० टक्के कर्मचारी हे चाळीशीच्या आत आहेत. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्याने पाॅझिटिव्ह झालेले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. एजन्सीचालकांनी यातील काहींच्या प्रारंभी स्वॅब टेस्टही करून घेतल्या होत्या.
सॅनिटाईज मात्र होईना...
घरोघरी सिलिंडर पोहोचते करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क सक्तीचा आहे. त्यानुसार ते मास्कचा वापर करत आहेत; परंतु सिलिंडर सॅनिटाईज करण्याबाबत मात्र उदासीनता असल्याचे दिसून आले आहे.
आमचे लसीकरण होत आहे. ही बाब आनंदाची आहे. त्यामुळे काम करताना आणखी हुरूप येणार आहे. घरोघरी सिलिंडर वाटप करताना सर्व काळजी घेतो. सिलिंडर सॅनिटाईजही केले जातात. ग्राहकांपासून अंतर ठेवले जाते.
-युसूफ पठाण, नंदूरबार.
लसीकरणामुळे कोरोनाचा धोका कमी होईल, ग्राहकांना सिलिंडर देताना ते चेक करून देतो. याकाळात ग्राहकांसोबत संपर्क येतो. त्यातून संसर्गाची भीती होती; परंतु आता मात्र कोणतीही भीती नाही. लवकर लस देणे गरजेचे आहे.
-डिलिव्हरी बाॅय, नंदूरबार.
गॅस वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लस देण्याबाबत केंद्र सरकारकडून आदेशित करण्यात आले आहे तसेच पत्र गॅस एजन्सीचालकांना प्राप्त झाले आहेत. त्यातून या कर्मचाऱ्यांचा समावेश फ्रंटलाईन वर्कर म्हणून करून घेण्यात येणार आहे तसे नियोजन सुरू आहे.
-डाॅ. एन. डी. बोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार