लंगडी वनक्षेत्रातील वृक्षतोड प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:25 IST2021-07-25T04:25:57+5:302021-07-25T04:25:57+5:30
आरोपींना लवकरच धरपकड मंदाणे - शहादा तालुक्यातील लंगडी - शहाणे वनक्षेत्रातील शेकडो झाडांची कत्तल केल्याप्रकरणी वनविभागाकडून वरिष्ठ पातळीवरून गंभीर ...

लंगडी वनक्षेत्रातील वृक्षतोड प्रकरण
आरोपींना लवकरच धरपकड
मंदाणे - शहादा तालुक्यातील लंगडी - शहाणे वनक्षेत्रातील शेकडो झाडांची कत्तल केल्याप्रकरणी वनविभागाकडून वरिष्ठ पातळीवरून गंभीर दखल घेण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घटनास्थळी भेटीनंतर चौकशीस वेग आला आहे.
दरम्यान शनिवारी २४ जुलै रोजी कत्तल झालेल्या झाडांची मोजणी करण्यात येत असून जवळपास एक हजारच्या पुढे आकडा जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याप्रकरणी वृक्षतोड करणाऱ्यांपैकी सुमारे चौदा जणांची नावे निष्पन्न झाली असून त्यांना लवकरात लवकर पकडण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
शहादा तालुक्याच्या पूर्व आदिवासी भागातील मंदाणे, शहाणे व जयनगर वनक्षेत्रात सुमारे १५ ते २० हजार हेक्टर वनजमीन आहे. एका वनसंरक्षकाकडे सुमारे १३०० हेक्टर वनक्षेत्र सांभाळण्याची जबाबदारी असून दूधखेडा येथे स्वतंत्र रोपवाटिका ही आहे. या क्षेत्रात अनेक डोंगर, टेकड्या, दऱ्या खोऱ्यात जंगल पसरलेला आहे.गेल्या आठवड्यात लंगडी , शहाणे ,बोरपाणी वनक्षेत्रात कक्ष क्रमांक ५७२ व ५७३ ह्या भागात शेकडो अज्ञात लोकांनी लहान मोठ्या झाडांची अमानुषपणे कत्तल केल्याची घटना घडली. ह्या घटनेने जिल्हाभरात खडबळ उडाली आहे.
घटनेचे वृत्त कळताच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी लंगडी, गोटाळी, बोरपाणी जंगलात फौजफाट्यासह तळ ठोकून आहेत. ह्या घटनेचे वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली आहे. लंगडी येथील वनसंरक्षण समिती व ग्रामपंचायतीनेही या प्रकरणी सखोल चौकशी होऊन झाडांची कत्तल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी वरिष्ठांकडे केली आहे. ह्या घटनेप्रकरणी वनविभागाचे गस्ती पथकाचे वनक्षेत्रपाल शिवाजी रत्नपारखे, नंदुरबार वनक्षेत्रपाल मनोज रघुवंशी, शहादा वनक्षेत्रपाल एस. के. खुणे, जयनगर वनपाल जगदाळे, शहाणे येथील वनपाल राजपूत, आष्टे वनपाल युवराज बाबड व ४० ते ५० वनरक्षक, वनकर्मचारी,मजूर यांचे उपस्थितीत कत्तल झालेल्या झाडांची मोजणी करण्यात येत असुन संध्याकाळ पर्यंत ८०० झाडांची मोजणी झालेली होती. या प्रकरणी झाडांची कत्तल करणाऱ्यांची संख्या मोठी असली तरी आतापर्यंतच्या चौकशीत चौदा जणांची नावे निष्पन्न झाल्याने त्यांना लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याचे वनाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तसेच वनक्षेत्रपाल व काही कर्मचारी यांच्यावरही कारवाई होणार असल्याचे सांगितले जात आहे .