शहाद्यात होणार शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण, स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:33 IST2021-08-22T04:33:14+5:302021-08-22T04:33:14+5:30

नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या सूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराज स्मारकस्थळी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पालिकेचे गटनेते प्रा.मकरंद ...

Dedication of equestrian statue of Lord Shiva to be held at Shahada, memorial work in final stage | शहाद्यात होणार शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण, स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात

शहाद्यात होणार शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण, स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात

नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या सूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराज स्मारकस्थळी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पालिकेचे गटनेते प्रा.मकरंद पाटील, जि.प.चे माजी सभापती अभिजित पाटील, मुख्याधिकारी राहुल वाघ, माजी नगरसेवक संजय चौधरी, पं.स.चे माजी सदस्य शिवाजी पाटील, मंदाणेचे उपसरपंच अनिल भामरे, बांधकाम अभियंता संदीप टेंभेकर, दत्तात्रय शिंदे, छोटू पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ.किशोर पाटील, आर.आर. बोरसे, गिरीश पटेल, किशोर मोरे, डॉ.गोकूळ साळुंखे, सुकदेव पाटील, सदाशिव पाटील, भाऊसाहेब राजपूत आदी उपस्थित होते.

शहरात छत्रपती शिवरायांचे अश्वारुढ स्मारक व्हावे ही अनेक वर्षापासून शहादावासीयांची इच्छा होती. ती आता साकार होताना दिसून येत आहे. पालिकेच्या वतीने स्मारक परिसरात चौथरा तयार करून सुशोभिकरण करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून मुंबई येथील शिल्पकार चंद्रजित यादव यांच्याकडे सुरू असलेल्या अश्वारूढ शिवस्मारकाचे कामदेखील शेवटच्या टप्प्यात आले आहे. सप्टेंबर अखेरीस शहरात भव्य शिवस्मारकाचे लोकार्पण करण्याचा मानस बैठकीत मान्यवरांनी व्यक्त केला. त्यादृष्टीने उर्वरित निधी संकलन व लोकार्पणचे नियोजन याविषयी तयारीला लागण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.

मुंबई (कांदिवली) येथील शिल्पकार चंद्रजित यादव यांच्या स्टुडिओत तयार होणाऱ्या साडेतेरा फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा निर्माण कामाची पाहणी शिवस्मारक समितीच्या वतीने करण्यात आली. तेथील कामही अंतिम टप्प्यात आले आहे. शहरवासीयांसाठी अभिमानाची बाब असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा समितीच्यावतीने दिमाखदारपणे साजरा करण्यात येणार आहे. उर्वरित निधी संकलनाचे कामदेखील आजपासून समितीच्यावतीने सुरू करण्यात आले असून यासाठी जिल्ह्यातील दानशूर नागरिक व शिवभक्तांनी स्वयंस्फूर्तीने आर्थिक मदत करावी, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

शहरात शिवरायांचे अश्वारूढ स्मारक व्हावे ही मागील अनेक वर्षापासून शिवभक्तांची इच्छा होती. ती आता प्रत्यक्षात साकार होताना दिसून येत आहे. स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आले असून यासाठी पालिकेतील पदाधिकारी, सर्वपक्षीय नगरसेवक, अधिकारी व शहरातील सर्व शिवभक्तांचे मोठे सहकार्य लाभत आहे. आता अंतिम टप्प्यात लोकवर्गणीतून निधी संकलनाचे काम सुरू झाले असून शिवभक्तांनी या भव्य स्मारकासाठी आपले आर्थिक योगदान द्यावे. सप्टेंबर महिन्यात स्मारकाचे लोकार्पण करण्याचा मानस बैठकीत ठरवण्यात आला आहे.

-मोतीलाल पाटील, नगराध्यक्ष, शहादा

Web Title: Dedication of equestrian statue of Lord Shiva to be held at Shahada, memorial work in final stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.