कोरोनाच्या काळात मृत्यू वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 12:47 IST2020-08-22T12:44:15+5:302020-08-22T12:47:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचा सर्वाधिक संक्रमीत काळात अर्थात मे महिन्यात नंदुरबार शहरात सर्वाधिक अर्थात तब्बल ७०१ मृत्यूंची ...

कोरोनाच्या काळात मृत्यू वाढले
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाचा सर्वाधिक संक्रमीत काळात अर्थात मे महिन्यात नंदुरबार शहरात सर्वाधिक अर्थात तब्बल ७०१ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. सहा महिन्यातील हा उच्चांक ठरला. त्या खालोखाल जानेवारी महिन्यात ८० मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
जिल्ह्यात कोरोना संक्रमणाला एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरुवात झाली. पहिला रुग्ण १८ एप्रिल रोजी आढळून आला. सुरुवातीला कोरोना संक्रमणाचे प्रमाण अत्यल्प होते. संपुर्ण लॉकडाऊन आणि नागरिकांमध्ये असलेली भिती यामुळे एप्रिल महिन्यात कोरोनाला थोपवून धरण्यात यश आले. या काळात कोरोनामुळे आणि इतर आजार व नैसर्गिक मृत्यूचे प्रमाण देखील अगदीच नगण्य होते. त्यानंतरच्या काळात मात्र मृत्यूचे प्रमाण मोठ्याप्रमाणावर वाढले.
गेल्या सहा महिन्यांचा अर्थात जानेवारी ते जून या सहा महिन्यात पालिकेकडे मृत्यू नोंदीच आढावा घेतला तर कोवीड काळात मृत्यूची संख्या वाढल्याचे लक्षात येते. एप्रिल ते जून या तीन महिन्यात ७५५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यात एप्रिल महिन्यात पाच, मे महिन्यात ७०१ तर जून महिन्यात ४९ मृत्यू नोंद करण्यात आली आहे.
याउलट जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात १८७ जणांची मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यात जानेवारी महिन्यात ८०, फेब्रुवारी महिन्यात ५२ तर मार्च महिन्यात ५५ जणांचा मृत्यू झाल्याचे रेकॉर्डमध्ये नोंद आहे.
कोरोनामुळे आणि कोरोना संशयीतांचा मृत्यू झाल्यास गेल्या मे महिन्यापासून त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता प्रशासनातर्फेच अशा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. हे अंत्यसंस्कार पालिकेच्या जुन्या स्मशानभूमीत किंवा संबधीत धर्माच्या स्मशानभूमीत केले जात आहेत. त्यामुळे नंदुरबारात मृत्यूच्या नोंदी वाढल्याचे सूत्रांनी सांगितले.