बोरद शिवारात आढळला मृत बिबट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 13:11 IST2020-12-02T13:11:48+5:302020-12-02T13:11:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा तालुक्यातील बोरद शिवारात मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास केळीच्या शेतात बिबट्या मृत अवस्थेत ...

बोरद शिवारात आढळला मृत बिबट्या
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : तळोदा तालुक्यातील बोरद शिवारात मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास केळीच्या शेतात बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. या प्रकारामुळे बिबट्याच्या संचारावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तळोदा वनक्षेत्रातील बोरद परिमंडळात बोरद शिवारात समाविष्ट असलेल्या जुल्फीकार गुलाब तेली रा.बोरद यांच्या शेतात मंगळवारी शेतमालक व मजुरांना बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला आहे. याबाबतची माहिती त्यांनी वनविभागाला कळवली. त्यानंतर मेवासी वनविभागाचे सहायक वनसंरक्षक आर.एस. कापसे, वनक्षेत्रपाल नीलेश रोडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.नवले व रेंज टॉप तातडीने घटनास्थळी हजर झालेत. वनक्षेत्रपाल यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृत बिबट मादी असून अंदाजे वय १० ते १२ वर्षे वय असल्याचे सांगण्यात येत आहे. मृत बिबट तीन ते पाच दिवसांपूर्वी मृत झालेला असावा, त्याच्या शरीरावर कोणत्याही जखमा अथवा खुणा आढळल्या नाहीत. शरीर कुजल्यामुळे दुर्गंधी येत होती. वृद्धापकाळाने अथवा अन्न न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी बिबट्याच्या शरीरातील विविध अवयवांच्या व्हिसेरा काढला आहे. व्हिसेरा तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.
दरम्यान, या भागात बिबट्यासह इतर हिंस्त्र प्राण्यांचेही मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे. शेतकरी व मजुरांना ते वारंवार दिसूनही येतात. त्यामुळे परिसरात शेतमजूर कामावर येण्यास तयार होत नाहीत. शेतपिकांची वेळेवर मशागत होत नसल्याने उत्पन्नावर त्याचा परिणाम होऊन शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे वनविभागाने मोहीम राबवून या हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.