कोरोनानंतर सतावतोय ‘झिका’ व्हायरसचा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:21 IST2021-07-21T04:21:28+5:302021-07-21T04:21:28+5:30

नंदुरबार : कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली आहे. परंतु यापाठोपाठ आता झिका व्हायरसचा धोका असून, केरळ राज्यात झिका व्हायरसचे ...

Danger of Zika virus after corona! | कोरोनानंतर सतावतोय ‘झिका’ व्हायरसचा धोका!

कोरोनानंतर सतावतोय ‘झिका’ व्हायरसचा धोका!

नंदुरबार : कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली आहे. परंतु यापाठोपाठ आता झिका व्हायरसचा धोका असून, केरळ राज्यात झिका व्हायरसचे रुग्ण आढळल्याने देशात चिंता आहे. सध्या जिल्ह्यात झिका व्हायरसचा एकही रुग्ण आढळलेला नसल्याने नागरिकांना काळजी करण्याची गरज नसल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

जिल्ह्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर कीटकजन्य आजार व साथरोगांचा फैलाव होतो. जिल्ह्यात झिकाचा अद्याप एकही रुग्ण नाही, भविष्यातही असा रुग्ण आढळून येणे कठीण आहे. परंतु नागरिकांनी पावसाळ्यात साथीचे आजार बळावत असल्याने स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. तसेच आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे गरजेचे आहे.

या आहेत उपाययोजना

झिका आजारावर विशिष्ट औषध किंवा लस उपलब्ध नाही. रुग्णांच्या लक्षणांवरून उपचार केला जातो. यामध्ये रुग्णांनी पुरेशी विश्रांती घ्यावी. निर्जलीकरण टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थांचे सेवन करावे. घराच्या परिसरात डासांची पैदास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. आवश्यक औषधांची फवारणी करावी. आठवड्यातून एक ‘कोरडा दिवस’ पाळावा. मच्छरदानी वापरावी.

अशी आहेत लक्षणे

झिका व्हायरस या आजाराची लक्षणे सर्वसाधारण डेंग्यू आजाराप्रमाणे आहेत. आजारामुळे रुग्णाला ताप येतो व अंगावर रॅशेस उमटतात. डोळे येणे, सांधे व स्नायुदुखी, थकवा, डोकेदुखी आदी सौम्य स्वरूपाची लक्षणे दिसतात. या आजाराची लक्षणे २ ते ७ दिवसांपर्यंत राहतात.

‘झिका’ आजार कशामुळे होतो?

झिका हा विषाणू फ्लॅविव्हायरस या प्रजातीमधला असून हा एडीस डासांमार्फत पसरतो. याच डासांपासून डेंग्यू, चिकुनगुनिया या आजारांचा प्रसार होतो. झिका आजारावर कोणतेच विशिष्ट औषध किंवा लस उपलब्ध नाही. त्यामुळे लक्षणांनुसार उपचार होत असल्याची माहिती आहे.

जिल्ह्यात झिका या आजाराच्या एकाही रुग्णाची नोंद नाही. परंतु नागरिकांनी घर आणि परिसरात स्वच्छता बाळगणेही गरजेचे आहे. शहरी व ग्रामीण भागात हिवताप किंवा इतर लक्षणे असल्यास नागरिकांनी आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावेत.

- डॉ. एन.डी. बोडके,

जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: Danger of Zika virus after corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.