प्राण्यांसाठी ‘दाना-पाणी एटीएम’ची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:24 IST2020-03-16T12:23:55+5:302020-03-16T12:24:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : भुकेल्या प्राण्यांना भोजनाची व पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी येथील संकल्प ग्रुपतर्फे आचार्य तुलसी ...

 A 'Dana-water ATM' facility for animals | प्राण्यांसाठी ‘दाना-पाणी एटीएम’ची सोय

प्राण्यांसाठी ‘दाना-पाणी एटीएम’ची सोय

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : भुकेल्या प्राण्यांना भोजनाची व पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी येथील संकल्प ग्रुपतर्फे आचार्य तुलसी मार्गावर दाना-पाणी एटीएमची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जनावरांसाठी पाण्याचे कुंड ठेवण्यात आले. ग्रुपतर्फे राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमाचे शहरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
येथील सामाजिक संकल्प ग्रुपतर्फे भुकेल्या प्राण्यांसाठी अन्नाची सोय व्हावी याकरिता अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. अनेक नागरिक घरातील उष्टे व शिल्लक राहिलेले अन्न टाकून देतात. हे शिळे अन्न वाया न जाऊ देता त्याचा योग्य वापर व्हावा व त्याचप्रमाणे प्राण्यांना अन्न मिळावे यासाठी दाना-पाणी एटीएमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ग्रुपतर्फे आवाहन करण्यात आले आहे की, याठिकाणी नागरिकांनी आपल्या घरातील शिळे अन्न आणून टाकावे. या अन्नाचा उपयोग भुकेल्या प्राण्यांना होणार आहे. यामुळे अन्नदान करण्यासह अन्नाचा योग्य वापर करण्याची संधी उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी याठिकाणी अन्नदान करावे.
शहर व परिसरात मार्च महिन्यापासूनच उन्हाचा जोर वाढू लागल्याने प्राणी व पक्ष्यांना पाण्याची कमतरता भासते. जनावरांसाठी पाणी सहज उपलब्ध व्हावे याकरिता शहरातील वेगवेगळ्या १० ठिकाणी पाण्याचे कुंड ठेवण्यात आले आहेत. त्यात सदाशिवनगर, वृदांवननगर, शनिमंदिर, सुरभी संकुल, गजानन महाराज मंदिर, लोणखेडा या परिसराचा समावेश आहे. या कुंड्यांची जबाबदारी कुंड ठेवण्यात आलेल्या व शेजारी असणाºया घरमालकाला देण्यात आली आहे. घर मालकाने कुंडात रोज पाणी भरावयाचे आहे व तीन ते चार दिवसात कुंड स्वच्छ करण्याची स्वत:हून जबाबदारी घेतली आहे. तसेच संकल्प ग्रुपचे सदस्य गावात येता-जाता कुंडावर लक्ष ठेवून असतात. कुंड पाण्याने भरलेले व स्वच्छ आहे की नाही याची पाहणी करतात. या उपक्रमाबद्दल शहरवासीयाकडून संकल्प ग्रुपचे कौतुक करण्यात येत आहे व आमच्या परिसरातही कुंड लावा, अशी सर्वांकडून मागणी होत आहे. आगामी काळात शहरात अजून कुंड वाढवण्याचा संकल्प ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Web Title:  A 'Dana-water ATM' facility for animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.