नुकसानीने मोड व सोनवल परिसर सुन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 12:47 IST2020-06-14T12:47:14+5:302020-06-14T12:47:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने तळोदा व शहादा तालुक्यातील मोड आणि सोनवलतर्फे बोरद ...

Damaged mode and Sonwal area numb | नुकसानीने मोड व सोनवल परिसर सुन्न

नुकसानीने मोड व सोनवल परिसर सुन्न

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने तळोदा व शहादा तालुक्यातील मोड आणि सोनवलतर्फे बोरद परिसरात प्रचंड हानी झाली असून त्यामुळे परिसर सुन्न झाला आहे. या घटनेत शेतीपिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर असंख्य घरांची पडझड झाली आहे.
शहादा तालुक्यातील काही भागात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यात साऱ्यांचीच त्रेधातिरपीट उडाली. दिवसभर उकाडा जाणवत होता. सायंकाळी अचानक पावसाला सुरुवात झाली. त्यात नुकताच लावलेल्या कोवळ्या कापसाचे, पपई, केळी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तालुक्यातील काही भागात निसर्ग चक्रीवादळापेक्षाही भयानक वादळ सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास धडकले, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पावसाबरोबर जोरदार हवाही सुरू झाली. काही क्षणातच हवेचे वादळात रूपांतर झाले. पत्रे उडण्याचा आणि झाडे तुटण्याचा जोरजोराचा आवाज आला. त्यात वीजपुरवठा करणारे रोहित्रही कोसळल्याने सर्वत्र अंधार पसरला. अनेक विजेचे खांबही जमीनदोस्त झाल्याने मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली असली तरी सुदैवाने जीवितहानी झाली नाही. यात जखमी मात्र आहेत. त्यात डोंगरगाव, ता.शहादा येथील गुरु भुºया भिल यांच्या घराची भिंत कोसळून त्यात १७ वर्षीय मुलगी जखमी असून तिच्यावर शहादा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच सोनवलतर्र्फेे बोरद येथे घर कोसळल्याने सनलाल गुलू भिल (४५), आमशी सनलाल भिल (४०), संजय सनलाल भिल (१८), आनंदी दिनेश भिल (वय १८) हे जखमी आहेत. त्यांच्यावर नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर भादे येथे रोहिदास भगवान पाटील यांच्या घरावर वीज कोसळली. त्यात भिंतीला तडे पडून घरातील विजेच्या उपकरणांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मोहिदेतर्फे शहादा येथेही शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वाºयाच्या वेगाने शेतात पसरवलेल्या ठिबकच्या नळ्याही इतरत्र उडाल्या.
सोनवलला वादळाचे थैमान
शहादा तालुक्यातील सोनवलतर्फे बोरद येथे शुक्रवारी सायंकाळी पाच वाजून २० मिनिटांनी पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला हवा सुरू झाली. मात्र काही वेळातच या हवेचे रुपांतर अचानक जोरदार वादळात झाले. या वादळाने सुमारे २० मिनीटे थैमान घातले. त्यात मोठमोठी झाडे उन्मळून पडली. विजेचे व डीपीचे खांब कोसळून ते जमीनदोस्त झाले. अनेक घरांच्या छतावरील पत्रे कागदाप्रमाणे इकडून तिकडे उडू लागली. त्यामुळे गावात सर्वत्र आरोळ्या व किंचाळण्याचा आवाज ऐकू येत होता. २० मिनीटातच या वादळाने गावात विदारक स्थिती निर्माण करुन टाकली. गावातील अनेक कच्च्या घरांच्या भिंती पडल्या. सनलाल गणू भील यांचे घर कोसळल्याने त्यात ते बायको-मुलांसह दाबले गेले होते. त्यांना जबर मार लागला आहे. काही गुरेही दाबली गेली. गावातील तरुणांनी तातडीने मदतकार्य करून जखमींना दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. गाव व परिसरातील रोहित्र व विजेचे खांब जमीनदोस्त झाल्याने गावातील चौक व गल्ल्यांमध्ये सर्वत्र विजेच्या तारा पडल्या होत्या. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. शेतपिकांचेही मोठे नुकसान झाले असून ऊस, पपई, केळी, नुकताच लागवड केलेले कापसाचे पीक मुळासकट उपटून पडले आहेत. सोनवल येथील कन्हैयालाल पाटील या शेतकºयाचा दोन एकर क्षेत्रातील पाच महिन्याचे उसाचे पीक या वादळामुळे भुईसपाट झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे सोनवल गावाच्या आजूबाजू कुठेही वादळ नव्हते. जि.प. सदस्य धनराज पाटील, पंचायत समितीचे उपसभापती रवींद्र पाटील, सरपंच, उपसरपंच, कन्हैया पाटील यांनी लोकप्रतिनिधी व अधिकाºयांना संपूर्ण नुकसानीची पाहणी करण्यासाठी आग्रह केला व तात्काळ मदत देण्याची मागणी केली. संकल्प ग्रुप शहादा यांनी नुकसानग्रस्तांना दोनवेळा भोजनाची व्यवस्था केली. गावात पाणीपुरवठा व वीजपुरवठा तातडीने सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
तसेच मामाचे मोहिदे शिवारातील शेतात गुडघाएवढे पाणी असल्यामुळे पेरणी झालेल्या शेतकºयांचे नुकसान झाले आहे. काही शेतांमध्ये पाणी साचल्याने नुकतेच पेरणी केलेला खर्च वाया गेला आहे. मोहिदे शिवारातील राजाराम गोरख पाटील यांच्यासह इतर शेतकºयांचे सोयाबीन, मका आदी पिकांचे नुकसान झाले आहे.
प्रकाशा परिसर
शहादा तालुक्यातील करणखेडा, वैजाली, काथर्दे, नांदर्डे, पुनर्वसन वसाहत आदी गावांमध्ये वाळामुळे पाच ट्रान्सफार्मरसह ५० ते ६० विजेचे खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. तसेच झाडे उन्मळून पडली तर अनेक घरांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. काथर्दे पुनर्वसन येथे झालेल्या नुकसानीही पाहणी पालकमंत्री, खासदार, आमदार व वरिष्ठ अधिकाºयांनी केली. वीज कंपनीचे प्रकाशा येथील सहायक अभियंता राजेंद्र पाटील यांनी लाईनमन यांच्यासह पडलेले रोहित्र व वीज खांबांची पाहणी करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शनिवारी दुपारपर्यंत डामरखेडा, करजई, बुपकरी आदी गावांचा वीजपुरवठा सुरळीत झाला होता. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून उर्वरित गावांचा वीजपुरवठा सायंकाळपर्यंत सुरळीत होईल, असे सांगण्यात आले.
प्रकाशा येथे बीएसएनएल
आऊट आॅफ कव्हरेज
शुक्रवारी सायंकाळी पाऊस झाला झाला, रात्रभर सुरुच होता. प्रकाशा येथे वीजपुरवठाही रात्रीच सुरळीत झाला. सकाळी सर्व काही सुरळीत असताना सकाळी पाऊस नाही, वारा नाही, वीजपुरवठा असतानादेखील प्रकाशा येथील बीएसएनएलचे टॉवर बंद होऊन आऊट आॅफ सर्व्हीस दाखवत आहे. डाटा कनेक्शन मिळत नसल्याने आॅनलाईन क्लासेससाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागली. शहादा कार्यालयात तक्रार करूनही त्यांनी दाखल घेतली नाही.
तळोदा तालुका
तळोदा तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी जोरदार वादळासह पावसाने हजेरी लावली. या वादळामुळे तालुक्यातील तºहावद, रेवानगर, मोड येथील पुनर्वसन वसाहतींमधील साधारण शंभरापेक्षा अधिक घरांच्या कौलारु छपरांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय तळोदा शहरातील शहादा रस्त्यावरील काही व्यावसायिकांच्या टपºयांचेही पत्रे उडाले होते. या वादळामुळे वीज खांब कोसळून वीज तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाºयांनी युद्धपातळीवर काम करून शनिवारी दुपारी वीजपुरवठा सुरळीत झाला. काही ठिकाणी मात्र विजेचे खांब कोसळल्याने व तारा तुटल्याने तेथे दुरुस्तीचे काम सुरू होते. झाडे उन्मळून पडल्याने काही ठिकाणी वाहतूकही ठप्प झाली होती. तळवे गावानजीक उपसरपंच मंगेश तनपुरे या शेतकºयाच्या ट्रॅक्टरवर झाड पडल्यामुळे ट्रॅक्टरचा बोनटचा भाग पूर्णत: दाबला गेल्याने नुकसान झाले आहे. सुदैवाने चालकास कुठलीही इजा झाली नाही. तथापि, ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे. जोरदार वादळामुळे बागायती शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
बोरद परिसर
बोरद परिसरातील मोड, खरवड, तºहावद, बोरद, खेडले, धानोरा, कढेल या भागात वादळामुळे घरांच्या पडझडसह शेतपिकांचे नुकसान झाले. या वादळामुळे विजेचे खांब व रोहित्रही जमीनदोस्त झाल्याने अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. लॉकडाऊनमुळे शेतमालाला योग्य बाजारपेठ व भाव मिळत नसल्याने शेतकरी आधीच कर्जबाजारी झाला आहे. त्यात वादळामुळे केळी, ऊस, पपई, कापूस पिकांचे नुकसान झाल्याने शेतकºयांचे आर्थिक गणित पूर्णत: बिघडल्याने शेतकरी चिंतेत आहेत. आमलाड शिवारात वादळामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान झाले असून शेतकºयांनी नुकसान भरपाई त्वरित मिळण्याची मागणी केली आहे.
आमलाड शिवारातील राजश्री वसंत पाटील यांच्या सहा एकर क्षेत्रात जानेवारी महिन्यातील लागवड केलेली केळीची सुमारे १० हजार झाडे वादळामुळे जमीन दोस्त झाली. लॉकडाऊनमुळे केळीची व्यापाºयांकडून खरेदी न झाल्याने आधीच नुकसान सहन करावे लागत आहे. त्यात शुक्रवारी आलेल्या वादळाने भर पडली असून शेतकरी कर्जबाजारी होणार आहेत. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकºयांना तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Damaged mode and Sonwal area numb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.