३१ जुलै पासून संचारबंदीत शिथीलता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 12:41 IST2020-07-30T12:41:06+5:302020-07-30T12:41:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा, नवापूर या चार नगरपालीका/नगरपंचायत क्षेत्राच्या ठिकाणी ३० जुलै च्या मध्यरात्री ...

३१ जुलै पासून संचारबंदीत शिथीलता
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा, नवापूर या चार नगरपालीका/नगरपंचायत क्षेत्राच्या ठिकाणी ३० जुलै च्या मध्यरात्री संचारबंदीचा कालावधी संपुष्टात येत असल्याने संचारबंदीत शिथिलता देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.
या शहरात ३१ जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील सर्व ठिकाणी वैद्यकीय सुविधा, मेडीकल स्टोअर पुर्णवेळ सुरु राहतील. त्या व्यतिरिक्त सर्व आस्थापना, दुकाने हे सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आलेली आहे. ४ आॅगस्ट पासून जिल्ह्यातील सर्व आस्थापना, दुकाने हे सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंतच सुरु ठेवण्यास मुभा राहील. जिल्ह्यातील शहरी भागात प्रत्येक रविवारी सकाळी ९ पासून मध्यरात्रीपर्यंत जनता कर्फ्यु (संचारबंदी) लागू राहील. केवळ वैद्यकीय कारणासाठी नागरिकांना आपल्या घराबाहेर निघण्यासाठी मुभा राहील, तथापि नागरिकाजवळ सबळ पुरावे असणे बंधनकारक असेल. रविवारी शहरातील वैद्यकीय सुविधा,मेडीकल स्टोअर पुर्णवेळ सुरु राहतील. दूध आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास अनुमती राहील.
ज्या ठिकाणी गर्दी होईल अथवा सामाजिक अंतराचे नियम पाळले जात नसतील त्या ठिकाणी संबधित ग्रामपंचायत तसेच पोलीस प्रशासनाकडून तात्काळ दुकाने बंद करण्यात येतील. आगामी सण उत्सव कालावधीत प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन करणे बंधनकारक राहील. आदेशाचे पालन न करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे.