जिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन मशिन कोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 12:40 IST2019-11-06T12:40:40+5:302019-11-06T12:40:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन महिन्याभरापासून खराब झाल्यामुळे बंद पडले आहे. त्यामुळे या रुग्णालयातील ...

जिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन मशिन कोमात
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन महिन्याभरापासून खराब झाल्यामुळे बंद पडले आहे. त्यामुळे या रुग्णालयातील गोरगरीब रुग्णांना बाहेरील खासगी दवाखान्यातून सीटी स्कॅन करून आणावे लागत आहेत.
वाढत्या महागाईत गरीब रुग्णांना वाजवी खर्च आजारातून पूर्णपणे सुटका होण्यासाठी जिल्हा रुग्णालयच आशेचे स्थान ठरते. जिल्हा रुग्णालयात गंभीर आजरांचे निदान करण्यासाठी सीटी स्कॅन मशीन कार्यान्वित करण्यात आले आहे. याद्वारे रुग्णांच्या आजारांचे योग्य निदान करीत त्यांच्यावर उपचार करण्यात येतो. परंतु हे मशिनच महिनाभरापासून बंद असल्यामुळे तेथे गंभीर आजारांचे निदान करता येत नाही. बहुतांश रुग्णांना बाहेरुन सीटी स्कॅन करीत अजाराचा अहवाल सादर करावा लागत आहे. त्यातून गरीब रुग्णांना न पेलवणारा खर्च करावा लागत आहे.
आधीच नंदुरबार हा मागासलेला जिल्हा असून जिल्ह्यात मागास नागरिकांचीच अधिक संख्या आहे. या मागास समाजातच सर्वाधिक गंभीर स्वरुपाचे आजार निर्माण होत आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात सीटी स्कॅन मशिनसारख्या यंत्रणेची नितांत आवश्यकता भासत आहे. सर्व सामान्यांच्या सुविधेसाठी ताडीने मशिन सुरु करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.
सीटी स्कॅन मशिन पडताच जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत नवीन मशिन उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठविला होता. प्रस्ताव मंजूर होऊन शासनाकडून नवे मशिनही उपलब्ध झाले आहेत. परंतु हे मशिन सुरू करण्यासाठी अधिक दाबाच्या वीजेची आवश्यकता भासत आहे. या मशिनला अनुसरून वीज पुरवठा होऊ शकत नाही. त्यामुळे हे मशिन पडूनच असल्याचे सांगण्यात येते. वाढीव वीज पुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी रुग्णालय प्रशासनाच्या पातळीवरुन कार्यवाही सुरू असल्याचे देखील सांगण्यात आले.