प्रकाशा येथील तापी नदीपात्रात मच्छीमारांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:28 IST2021-08-01T04:28:05+5:302021-08-01T04:28:05+5:30
प्रकाशा येथील तापी नदीतील मासे चविष्ट असतात. त्यामुळे लांबलांबून लोक प्रकाशा येथे मासे खरेदीसाठी गर्दी करतात. शनिवारी सकाळी साडेआठ ...

प्रकाशा येथील तापी नदीपात्रात मच्छीमारांची गर्दी
प्रकाशा येथील तापी नदीतील मासे चविष्ट असतात. त्यामुळे लांबलांबून लोक प्रकाशा येथे मासे खरेदीसाठी गर्दी करतात. शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास प्रकाशा बॅरेजचे गेट बंद करण्यात आले. त्यामुळे प्रकाशासह परिसरातील मच्छीमार नदीपात्रात उतरले होते. सर्व जण एकाचवेळी तापी नदीत मासे पकडण्यासाठी उतरल्याने गर्दी झाली होती. दीड-दोन तासातच मच्छिमारांनी बऱ्यापैकी मासेमारी केली. यात कटला, गोलवा, डोकीन, पाम आदी प्रकारचे मासे हाती लागले. एका मासळीचे वजन एक किलोपासून तर २० ते २५ किलोपर्यंत होते. एक-दोन मच्छीमारांना तर कधी न आढळून येणारा कोळंबी झिंगा हा प्रकारदेखील हाती लागला होता. मात्र त्याला न विकता त्यांनी घरीच ठेवला. येथे मासे खरेदीसाठी व्यापारी व खवैय्यांनी तापी नदीकाठावरच गर्दी केली होती. तीन दिवसापूर्वीही बेरेजचे गेट बंद झाल्यानंतर बऱ्यापैकी मासे हाती लागले होते.
एकंदरीत प्रकाशा येथील तापी नदीमध्ये शनिवारी बऱ्यापैकी मासे मिळाल्याने मच्छीमारांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र अशी स्थिती रोज रोज येत नाही. कारण की पावसाळ्याचे सुरुवातीचे दिवस आहेत त्यामुळे प्रकाशा तापी नदीचे पाणी पुढे उकई धरणाला मिळते. त्यामुळे तेथील मासे उलट दिशेने प्रवास करत प्रकाशा येथील तापीपात्रात येतात. ज्यावेळी गेट बंद होतात त्यावेळी पाणी थांबल्यानंतर मासे मागे न जाता तिथे अडकतात म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर मासे हाती लागतात. हा प्रकार पावसाळ्यात फक्त चार ते पाचवेळा बघायला मिळतो. नंतर मात्र मच्छीमारांना हातावर हात धरून बसावे लागते. काही मच्छीमार व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मासेमारीवरच असतो. मात्र किलो दोन किलो मासेच मिळत असल्याने त्यांना उदरनिर्वाह करताना तारेवरची कसरत करावी लागते.
आजचा दिवस मच्छिमारांसाठी चांगला होता. मात्र नेहमीच असा दिवस राहत नाही. पावसाळ्यात तीन ते चारवेळा गेट चालू-बंद होते. तेव्हाच असा दिवस येतो, अन्यथा नाही. वर्षभर हातावर हात धरून बसावे लागते.
-सीताराम भगत, मच्छीमार, प्रकाशा, ता.शहादा