लॉकडाऊन संपताच शहरांमध्ये गर्दी ‘अप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 12:41 IST2020-08-01T12:41:29+5:302020-08-01T12:41:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार/शहादा/कोठार/नवापूर : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखला जावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने ३० जुलैपर्यंत चार शहरे लॉकडाऊन करण्याचे ...

Crowds ‘up’ in cities as lockdown ends | लॉकडाऊन संपताच शहरांमध्ये गर्दी ‘अप’

लॉकडाऊन संपताच शहरांमध्ये गर्दी ‘अप’



लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार/शहादा/कोठार/नवापूर : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखला जावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने ३० जुलैपर्यंत चार शहरे लॉकडाऊन करण्याचे जाहिर केले होते़ यानुसार गुरूवारी मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन सुरू होते़ शुक्रवारचा दिवस उजाडल्यावर लॉकडाऊन संपुष्टात आले असून सकाळी आठ वाजेपासूनच बाजारात गर्दी मावत नसल्याचे चित्र नंदुरबार, शहादा, तळोदा आणि नवापूर शहरात दिसून आले़
नंदुरबार
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आठ दिवस वैद्यकीय सुविधा वगळता सर्वच दुकाने बंद असल्याने शहर पूर्णपणे बंद होते़ कोणत्याही प्रकारचे व्यवसाय सुरू नसल्याने गल्लोगल्ली शुकशुकाट होता़ शुक्रवारी सकाळी सात वाजेपासून शहरातील व्यवहार सुरू झाले़ यात प्रारंभी दुग्धव्यवसाय करणारे दिसून येत होते़ मध्यरात्रीच लॉकडाऊनचा कालावधी संपल्याने बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्ण करण्यात आले़ यातून तालुक्यासह लगतच्या गुजरात राज्यातील व्यापारी भाजीपाला घेऊन सकाळी रवाना झाले़ आठ दिवस भाजीपाला मिळाला नसल्याने अनेकांनी सात वाजेपासूनच बाजारात भेटी देणे सुरू केले होते़ यातून हाट दरवाजा, नेहरू चौक, बाजार समिती परिसर, अंधारे चौक ते आमदार कार्यालय, सुभाष चौक परिसर आणि मंगळबाजारात भाजीपाला खरेदी करणाऱ्यांची गर्दी झाली होती़ सकाळच्या प्रहरीच वाहने बाजारात येऊन लागल्याने १० वाजेनंतर वाहतूकीची कोंडी झाल्याचा प्रकार सुरू झाला़ नगरपालिका चौक ते शास्त्री मार्केट तसेच इतर भागात वाहने निघण्यास अडचणी येत असल्याचे दिसून आले़
दरम्यान किराणा दुकाने, कपड्यांची दुकाने तसेच विविध दुकाने सुरू झाल्याने खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती़ शहरातील सर्वच भागात झालेल्या गर्दीमुळे आठ दिवस लागू केलेल्या लॉकडाऊनवर पाणी फेरले गेल्याचे चित्र शहरात होते़
तळोदा
सात दिवसांच्या लॉकडाऊन नंतर शुक्रवारी तळोदा शहरातील बाजारपेठ पूर्वरत सुरु झाली. शुक्रवार हा आठवडे बाजाराचा दिवस असल्याने ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने बाजारात दाखल झाले होते़
सकाळी शहरातील सर्व दुकाने व सर्व आस्थापना सुरू करण्यात आल्या़ आठवडे बाजाराचा दिवस असल्याने व्यावसायिकांनी सकाळीच आपल्या दुकाने उघण्याची तयारी करून ठेवली होती. सकाळी ९ वाजेपासून दुकाने उघडण्यास परवानगी असली तरी अनेक जण अगोदर दुकानामध्ये जाऊन साफसफाईची कामे केली व ग्राहकांसाठी ९ वाजेनंतर दुकाने खुली केलेली दिसून आली. ग्रामीण भागातून येणारे ग्राहक देखील आठ वाजेपासून बाजारात दाखल झाले होते़ दुकाने सुरू झाल्यावर काही किराणा दुकानांमध्ये गर्दी पाहायला मिळाली. दुकानदारांकडून फिजिकल डिस्टनसिंगचे वेळोवेळी आवाहन करण्यात येत होते़ मात्र ग्राहकांकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र होत. भाजीपाला मार्केटमध्ये देखिल सकाळच्या सुमारास ग्रामिण भागातून आलेल्या नागरीकांची गर्दी होती़
ग्रामीण भागातून मोठ्या संख्येत महिला शहरात आल्या होत्या़ राखी खरेदीवर महिला व युवतींनी भर दिल्याचे दिवसभरात दिसून आले़ दुपारी एक वाजेनंतर मात्र ग्रामिण भागातील नागरिक गावाकडे परत गेले़ अनपेक्षित लॉकडानची धास्ती असल्याने जास्तीत जास्त जीवनावश्यक साधनसामग्री घेण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत होता. स्मारक चौकात बाहेर गावांतून येणारे तांदूळ, कांदा, लसूण, विक्री करणारे विक्रेते आठवडे बाजाराचा दिवस असूनही येऊ शकले नव्हते़ त्यामुळे आठवडा बाजारात नेहमी गजबजलेला असणाºया या परिसरात अपेक्षेप्रमाणे गर्दी दिसून आली नाही़ शहरातील बँका आणि शासकीय कार्यालयांमध्येही नागरिकांनी विविध कामांसाठी गर्दी केल्याचे दिसून आले़ सायंकाळच्या सुमारास शहरातील नागरीक भाजीपाला व अन्य खरेदीसाठी बाजारात बाहेर पडतांना दिसून आले.
नवापूर
शहरात शुक्रवारी सकाळपासून बाजारपेठा गजबजल्याचे दिसून आले़ दरम्यान महिन्याच्या शेवटी स्वस्त धान्य दुकानांमधे धान्य उपलब्ध झाल्याने शहरातील सर्व रेशन दुकानांसमोर शिस्तबध्द रांगा होत्या. बँकाही आठ दिवसांपासून बंद राहिल्याने सोशियल डिस्टंसिंग ठेवून बॅकांसमोर ग्राहकांच्या रांगा दिसून आल्यात. कोरोनाच्या संसगार्पासुन स्वत:चा बचाव करा, सॅनिटायझर व मास्कचा महत्तम वापर करुन शासनाकडून देण्यात येणाºया सूचनांचे पालन करा असे तहसिलदार सुनिता जºहाड गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत वसावे, पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी कळविले आहे.शहरातील विविध भागात दिवसभर गर्दी दिसून येत होती़ ग्रामीण भागातून नागरिक शहरात विविध वस्तूंच्या खरेदीसाठी आल्याचे दिसून आले़

Web Title: Crowds ‘up’ in cities as lockdown ends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.