तळोद्यात भर पावसात मूर्ती खरेदीसाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 12:27 IST2020-08-23T12:27:35+5:302020-08-23T12:27:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा शहरासह तालुक्यात यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याने घरगुती ...

तळोद्यात भर पावसात मूर्ती खरेदीसाठी गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : तळोदा शहरासह तालुक्यात यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याने घरगुती गणपती बसविण्याकडे तरुणांचा कल दिसून आला. त्यामुळे शहरात लहान गणेश मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी होती.
कोरोनाच्या संकटामुळे यावर्षीच्या सर्वच सणांच्या आनंदावर विरजण पडत आहे. गणेशोत्सवही त्यातून सुटलेला नाही. तळोदा शहरात शनिवारी गणेशोत्सवाची स्थापना होत असताना मोठ्या प्रमाणावर भाविक घरगुती गणेश प्रतिष्ठापनेसाठी लहान श्री गणेशाच्या मूर्ती खरेदी करताना दिसून आले. सकाळपासून दुपारी चार वाजेपर्यंत शहरात मुसळधार पाऊस असल्याकारणाने भरपावसात अनेकांनी गणेशमूर्ती खरेदी करून घरी नेल्या. ग्रामीण भागातून गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी आलेले भाविकदेखील पावसामुळे गणपतीच्या दुकानात अडकून पडलेले दिसून आले. काहींनी प्लॅस्टीकचे आवरण चढवून पावसात भिजत गणेश मूर्ती घरी घेऊन जाणे पसंत केले.
शहरातील बहुतेक गणेश मंडळांनी य वर्षी गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे तर काही मंडळांनी अत्यंत साध्या पद्धतीने श्री गणेशाची स्थापना केली आहे. कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही यासाठी खबरदारी घेतलेली आहे. गणेशाची स्थापना करण्यात आलेल्या सार्वजनिक ठिकाणी केवळ आरतीच्या वेळेस प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरती व इतर पूजाविधी पार पाडल्या. यंदा कोणत्याही प्रकारच्या विसर्जन मिरवणुकीला परवानगी नसल्याने परंपरेत खंड पडू नये यासाठी श्रीगणेशाची स्थापना केली आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सव साजरा करण्याच्या परवानगीसाठी केवळ तीनच मंडळाकडून पोलीस प्रशासनाला अर्ज प्राप्त झाले होते. दिवसभर गणेशाची स्थापना करण्यात आलेली शेड किंवा मंडप हे बंद ठेवण्यात येणार असून केवळ आरतीसाठी व पूजेसाठी ती उघडण्यात येणार असल्याचे मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.