सोमावल येथील बँकेच्या शाखेबाहेर झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:31 IST2021-05-21T04:31:26+5:302021-05-21T04:31:26+5:30

दरम्यान, शासनाने लाॅकडाऊन काळात मदत म्हणून वैयक्तिक लाभाच्या योजनांद्वारे लाभार्थींची मंजूर रक्कम बँक खात्यात टाकण्याची कार्यवाही सुरू केली आहे. ...

A crowd outside a bank branch in Somaval | सोमावल येथील बँकेच्या शाखेबाहेर झुंबड

सोमावल येथील बँकेच्या शाखेबाहेर झुंबड

दरम्यान, शासनाने लाॅकडाऊन काळात मदत म्हणून वैयक्तिक लाभाच्या योजनांद्वारे लाभार्थींची मंजूर रक्कम बँक खात्यात टाकण्याची कार्यवाही सुरू केली आहे. यातून सध्या बँकांमध्ये गर्दी होत आहे. तळोदा ताुलक्यातील सोमावल येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत आसपासच्या २३ गावांमधील नागरिकांची खाती आहेत. यात झिरी, पाठडी, बियामाळ, पिंपरपाडा, सोरापाडा, शिर्वे, सोमावल बुद्रुक, सोमावल खुर्द, नळगव्हाण, गव्हाणीपाडा, ढेकाठी, वाल्हेरी, एकधड, सोजरबार, नर्मदानगर, रतनपाडा, उमरकुवा, काकलपूर, राणापूर, खुशगव्हाण, बेलीपाडा, लोभाणी व बुधावली या गावांतील खातेदारांचा समावेश आहे. सोमवारपासून बँका पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याने सध्या या बँकेच्या शाखेत गर्दी मावत नसल्याचे दिसून आले. पैसे खात्यात आले किंवा कसे याची माहिती नसल्याने अनेक जण केवळ बँकेच्या खात्यात किती पैसे आहेत. याची चाैकशी करण्यासाठी आलेे होते. या खातेदारांच्या मोबाइलवर कोणताही संदेश येत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर काहींना वाचता येत नसल्याने त्यांचा नाईलाज होत आहे. यातून बँकेबाहेर गेल्या चार दिवसांपासून तोबा गर्दी होत असल्याचे समोर आले आहे.

यावेळी वयोवृद्ध महिला व पुरुष येथे हजेरी लावत असल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. दरम्यान, खातेदारांच्या सोयीसाठी निर्माण करण्यात आलेल्या मिनीबँकांमध्ये कनेक्टिव्हिटीची समस्या असल्याने बँकेत गर्दी वाढली असल्याचे दिसून आले आहे. गर्दीवर मात करण्यासाठी बँक प्रशासनाने काही दिवसांसाठी प्रत्येक गावाला वार ठरवून रक्कम अदा करण्याची शक्कल लढवली आहे; परंतु यानंतरही दुसऱ्या गावातील लोक बँकेत येत असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, बहुतेक लाभार्थींनी योजनेची रक्कम म्हणून शासनातर्फे देण्यात येणारा लाभ जेमतेम दोन हजारांपर्यंत असून बँकेतील गर्दीमुळे वेळप्रसंगी तीन ते चार दिवस चकरा माराव्या लागतात. यामुळे येण्या-जाण्याचा वाहन खर्च करावा लागत असल्याचे सांगितले.

Web Title: A crowd outside a bank branch in Somaval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.