तळोद्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याचा सव्वा कोटींचा निधी परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 13:07 IST2018-05-09T13:07:25+5:302018-05-09T13:07:25+5:30
तळोदा पशुवैद्यकीय दवाखाना : जीर्ण इमारतीत काम करणे झाले कठीण

तळोद्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याचा सव्वा कोटींचा निधी परत
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 9 : टेंडर प्रकियेअभावी तळोदा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचा साधारण सव्वा कोटींचा निधी अखर्चित राहून परत गेला आह़े त्यामुळे या इमारतीचा प्रश्न पुन्हा रखडल्याचे चित्र दिसून येत आह़े
त्यामुळे संबंधित यंत्रणेच्या उदासिनतेबाबत पशुपालकांकडून तीव्र नाराजी व्यक होत असून या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी होत आह़े तळोदा येथील पशुवैद्यकीय दवाखाना गेल्या 35 ते 40 वर्षापासून सुरु करण्यात आलेला आह़े सदर दवाखाना जुना झाल्यामुळे त्याची इमारतसुध्दा अतिशय जीर्ण झाली आह़े ठिकठिकाणी स्लॅब उखळला गेला आह़े शिवाय भिंतीना तळेदेखील गेले आहेत़
पावसाळ्यात संपूर्णपणे इमारतीला गळती लागत असत़े अशाच स्थितीत यंत्रणेचा कारभार सुरु आह़े इमारतीची अशी दुरावस्था लक्षात घेऊन पशुपालकांकडून नवीन इमारत बांधण्याची मागणी केली जात होती़ साहजिकच या पाश्र्वभूमिवर स्थानिक यंत्रणेनेही या विभागाकडे इमारतीच्या प्रस्ताव अनेक वेळा पाठविला होता़ मात्र यावर कार्यवाही अभावी तो तसाच पडून राहत होता़ त्यानंतर पुन्हा 2017 मध्ये साधारण एक कोटी 18 लाखांचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविण्यात आला होता़
मात्र त्यास मार्च 2018 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळून निधीसु्ध्दा उपलब्ध करुन देण्यात आला हेाता़ तथापि टेंडर प्रक्रियेअभावी हा निधी शासनाकडे परत गेला आह़े अर्थात हे टेंडरींग प्रक्रियेसाठी लागणारा कालावधी पुरेसा नसल्यामुळे हा निधी परत करावा लागल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आह़े मात्र यंत्रणेच्या अनास्थेमुळे इमारतीचा प्रश्न पुन्हा रखडला आह़े वास्तविक दवाखान्याची इमारत अतिशय जीर्ण व पडकी झाली आह़े ती केव्हा कोसळेल याची शाश्वती नाही़ अशाच परिस्थितीत कर्मचारी तेथे जीव मुठीत घेऊन काम करीत असतात़ अशी वस्तूस्थिती असताना केवळ टेंडर प्रक्रियेची लंगडी सबब पुढे करुन इमारतीचा प्रश्न दुर्लक्षीत केला जात असल्याचा पशुपालकांचा आरोप आह़े
इमारतीसाठी मंजुर झालेला निधी पुन्हा शासनाकडून लगेच मिळेल काय? असा सवाल विचारण्यात येत आह़े केवळ यंत्रणेचा उदासिनतेमुळे दवाखान्याच्या इमारतीचे काम बारगळले असल्याची स्थिती आह़े या प्रकरणी चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी पशुपालकांकडून करण्यात येत आह़े तसेच या इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर करण्याचीही मागणी कायम आह़े