Crop loss in 1900 hectare area during kharif season | खरीप हंगामात १९०० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान

खरीप हंगामात १९०० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोरोना, त्यापाठोपाठ निसर्गाचा लहरीपणा, अवेळी पडणारा पाऊस, पिकांवर विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादन निम्म्याहून अधिक घटले, महागाईमुळे खर्च मात्र वाढला. यंदाच्या खरीप हंगामात शहादा तालुक्यात गेल्या चार महिन्यात सुमारे दोन हजार ५०० शेतकऱ्यांचे एक हजार ८०० हेक्‍टरवरील विविध पिकांचे  नुकसान झाले आहे. 
मागील काही वर्षांपासून शेतकरीवर्ग पुरता अडचणीतच आहे. अल्प उत्पादन, शेती पिकांना हमीभाव मिळत नाही. पिकांसाठी गुंतविलेले लाखो रुपयांचे भांडवल बाजारभाव न मिळाल्याने वाया गेले आहे. निसर्गानेही या काळात शेतकऱ्यांना आणखी खाईत लोटले आहे. अवकाळी पाऊस, विविध कीडजन्य आजार याचा फटका शेती पिकांना बसला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कोरोना विषाणूचे संकट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने सुरुवातीपासूनच खबरदारीचा उपाय म्हणून बाजारपेठा बंद केल्या होत्या. लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद होती. परिणामी  एप्रिल, मे, जून व जुलै महिन्यापर्यंत रब्बीतील शेतीमाल बाजारपेठेपर्यंत नेता आला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी शहरातील गल्लीबोळात जाऊन उत्पादीत माल विकला. काहींनी तर फुकटात वाटप केले होते.
खरीपातही नुकसान
यंदाच्या खरीपात शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पिकांची पेरणी केली. सुरुवातीला झालेल्या पावसाने जुलैअखेर दांडी मारली. परंतु ऑगस्टमध्ये झालेल्या संततधार पावसामुळे हातातोंडाशी आलेले मूग व उडदाचे पीक हिरावून नेले. यंदा जवळपास एक हजार हेक्टरवरील पिकांचे सर्वाधिक नुकसान ऑगस्टमध्ये झाले. त्यात बहुतांश शेतकऱ्यांचे क्विंटलचे उत्पादन किलोवर आले. त्यामुळे खर्चही निघाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार महिन्यात जवळपास दोन हजार ५०० शेतकऱ्यांचे एक हजार ८०० हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. बाधित क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे झालेत, आता मदतीची प्रतीक्षा लागून आहे.शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची गरज
दरम्यान, परतीच्या पावसानेही पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यात कापूस ओला झाला, ऊस आडवा झाला. बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन हातचे गेले. पपई, केळीचे  नुकसान आहेच. सर्वच बाजूंनी शेतकरी कात्रीत सापडला असून शासन स्तरावरून मदतीची गरज आहे. या पावसामुळे पाण्याची पातळी वाढण्यास मदत होऊन रब्बी हंगामातील पिकांना फायदा होणार आहे. मात्र आज खरीप पिकांच्या झालेल्या अतोनात नुकसानीचे पंचनामे होऊन त्याची तातडीने मदत मिळण्याची नितांत गरज आहे.

Web Title: Crop loss in 1900 hectare area during kharif season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.