रस्त्याच्या कामामुळे पिकांचे नुकसान, प्रकाशा येथील शेतकऱ्यांचे निवेदन; धुळीमुळे उत्पन्नावर परिणाम तर पाण्याच्या निचऱ्यासाठी चारी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:21 IST2021-06-11T04:21:15+5:302021-06-11T04:21:15+5:30
सविस्तर वृत्त असे की, गेल्या चार वर्षापासून प्रकाशा गावाजवळ, शहादा-प्रकाशा रस्त्यावर नियोजित कोळदा ते सेंधवा राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू ...

रस्त्याच्या कामामुळे पिकांचे नुकसान, प्रकाशा येथील शेतकऱ्यांचे निवेदन; धुळीमुळे उत्पन्नावर परिणाम तर पाण्याच्या निचऱ्यासाठी चारी नाही
सविस्तर वृत्त असे की, गेल्या चार वर्षापासून प्रकाशा गावाजवळ, शहादा-प्रकाशा रस्त्यावर नियोजित कोळदा ते सेंधवा राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू आहे. हे काम करीत असताना संबंधित ठेकेदाराकडून व खात्यातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे गेल्या तीन वर्षात रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या शेतजमिनीवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कारण रस्त्याचे काम करत असताना माती-मुरूम टाकली होती. वाहन गेल्यावर धूळ उडत होती. ही धूळ पिकांवर बसून अपेक्षित उत्पादन मिळू शकले नाही. याबाबत गेल्यावर्षी तक्रारी अर्ज दिला होता. त्यावेळी शहादा तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी शहादा यांच्याकडून संयुक्त पाहणी केली होती. प्रत्यक्ष स्थळाचे पंचनामे करून तीन वर्षांपासून सरासरी ५० टक्केपेक्षा जास्त नुकसान धुळीमुळे झाले आहे. असे नमूद करून पंचनामे केले असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. नुकसान भरपाई मिळावी यासाठी वेळोवेळी संबंधित ठेकेदाराला सांगण्यात आले. मात्र आजतागायत भरपाई दिलेली नाही. तसेच आता खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. आजपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. शेतातील पिकांचे यावर्षीदेखील नुकसान होणार आहे. शेत व बांधला लागून जागोजागी पावसाळ्याचे पाणी काढण्यासाठी चारी केली नसल्याने सर्व पाणी शेतात घुसून पिकांचे मोठे नुकसान होईल म्हणून संबंधित ठेकेदाराला वेळोवेळी विनंती करूनही ही कामे पूर्ण केली नाहीत व उडवाउडवीची उत्तर देण्यात येतात.
प्रकाशा गावाजवळ या रस्त्याची बरीच कामे अपूर्ण असल्याने मोठे अपघात होत आहेत. त्यात वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. शहादा-प्रकाशा दरम्यान गोमाई नदीवरील पूल व रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागते. अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण व ज्या ठिकाणी काम झाले आहे त्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावलेले नाहीत. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या साईडपट्ट्याही अयोग्य आहेत. या साईडपट्ट्यांवर वाळू पडलेली आहे. त्यामुळे मोटारसायकल स्लिप होऊन अपघात घडत आहेत.
उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा
प्रकाशा गावाजवळ रस्त्याच्या कामासाठी ठेकेदाराने बेकायदेशीररित्या सिमेंट मिक्सर प्लांट लावला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सिमेंटची धूळ उडून स्थानिक रहिवासी व रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना खूप त्रास होतो. त्यांचे आरोग्यही धोक्यात येत आहे. हा ठेकेदार रस्त्याचे काम करत असताना त्यांचे डंपर ओव्हरलोड भरून वाळूसह इतर माल वाहतूक करतात व जास्त वेगाने चालतात. त्यामुळे अनेक अपघात होत आहेत. तरी वरील समस्यांबाबत तत्काळ तोडगा काढून सर्व समस्यांचे निराकरण व्हावे. आठ दिवसांच्या आत उपाययोजना न झाल्यास प्रकाशा येथील शेतकरी व ग्रामस्थ नाइलाजाने आंदोलन करतील.
या समस्यांबाबत गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांच्या सर्व समस्या आठ दिवसाच्या आत सोडवाव्यात, असे निवेदन प्रकाशा येथील शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार, पोलीस अधीक्षक नंदुरबार, तहसीलदार शहादा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार, पोलीस निरीक्षक शहादा, सरपंच, ग्रामविकास अधिकारी प्रकाशा यांना दिले आहे.
प्रकाशा-डामरखेडा दरम्यान माझे शेत आहे. रस्त्याच्या कामामुळे गेल्या चार वर्षापासून उडणाऱ्या धुळीमुळे उत्पन्नात घट झाली आहे. याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहारही केला आहे. मात्र अद्याप आम्हाला नुकसान भरपाई मिळालेली नाही. पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी चारी होणे आवश्यक आहे. पावसाचे पाणी जर शेतात आले तर परत नुकसान होणार आहे. म्हणून नुकसान भरपाई द्यावी अन्यथा आंदोलन करणार.
- किशोर बुलाखी चौधरी, शेतकरी, प्रकाशा, ता. शहादा