नोकरीचे अमिष देत १८ लाख लाटणार्या संस्थाचालकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 13:18 IST2020-10-23T13:17:53+5:302020-10-23T13:18:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील आदिवासी पारधी शैक्षणिक मंडळाच्या चेअरमनसह तिघांविरोधात फसवणूकीचा गुन्हा शहादा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात ...

नोकरीचे अमिष देत १८ लाख लाटणार्या संस्थाचालकावर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील आदिवासी पारधी शैक्षणिक मंडळाच्या चेअरमनसह तिघांविरोधात फसवणूकीचा गुन्हा शहादा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. नोकरी देण्याचे आमिष दाखवून १८ लाख रूपयात सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक केल्याच्या तक्रारी झाल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.
आदिवासी पारधी शैक्षणिक संस्थेत २०१५ मध्ये वैशाली शत्रूघ्न पाटील रा. होळ ता. शिंदखेडा यांनी शिक्षक पदासाठी अर्ज केला होता. दरम्यान ही नोकरी देण्याच्या बदल्यात संस्थाचालक देविदास मांगु सोनवणे, सचिव राहुल सोनवणे व मेहुल सोनवणे यांनी १८ लाख रूपयांची मागणी वैशाली पाटील व त्यांच्या कुटूंबियांकडून केली होती. तिघांच्या भूलथापांना बळी पडून २०१५ मध्ये सप्टेंबर २०१५ मध्ये वैशाली पाटील, त्यांचे कुटूंबिय व अरुण अभिमान पाटील यांच्या उपस्थितीत रक्कम देण्यात आली होती. यातून २०१६ मध्ये वैशाली पाटील यांची नंदुरबार येथील विस्तार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुलाखत घेत नवागाव अनुदानित आश्रमशाळेत शिक्षण सेवक नियुक्तीचे पत्र देण्यात आले होते. परंतू यानंतर त्यांना प्रत्यक्ष नोेकरीवर मात्र रूजू करुन घेण्यात आले नाही. वारंवार तगादा लावूनही संस्थाचालक सोनवणे यांच्याकडून टाळाटाळ केली गेली तसेच पैसे परत मागितल्यावर धमकी देण्यात आल्याने वैशाली राहुल पाटील यांनी शहादा पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संस्थाचालक देविदास सोनवणे, सचिव राहुल सोनवणे व मेहुल सोनवणे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे करीत आहेत.
दरम्यान या संस्थाचालकांना रक्कम देत फसवणूक झालेल्यांनी संपर्क करण्याचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी कळवले आहे.