केळी दराबाबत व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 10:36 IST2020-12-19T10:36:10+5:302020-12-19T10:36:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जयनगर :  मार्च महिन्यात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन झाल्यामुळे एक हजार ते १२०० रुपये प्रति क्विंटल विक्री ...

Credit plan of Rs 1,500 crore | केळी दराबाबत व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

केळी दराबाबत व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
जयनगर :  मार्च महिन्यात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन झाल्यामुळे एक हजार ते १२०० रुपये प्रति क्विंटल विक्री होणारी केळी फक्त ३५० ते ३५० रुपये प्रती क्विंटल दराने व्यापाऱ्यांनी खरेदी केली होती. मात्र आता कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे तसेच लॉकडाऊन नसताना केळीला त्याप्रमाणेच ३०० ते ४५० रुपये प्रती क्विंटल दर मिळत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडून अधिकच कर्जबाजारी होत आहे. त्यामुळे केळीला योग्य भाव मिळण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 
             तालुक्यातील जयनगरसह वडाळी, बामखेडा, कोंढावळ, कुकावल,    कोठली, धांद्रे, निंभोरे येथील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड करतात. यावर्षीही या परिसरात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड झाली आहे. मात्र  मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही         केळीला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. 
             हिवाळ्याच्या दिवसात केळीला चांगली मागणी असते. आता मार्गशीर्ष महिना हा खास करून महिलांचा उपवासाचा महिना आहे. या महिन्यात फळांना चांगली मागणी असते. पण व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही. केळी लागवडीपासून तर उत्पन्न मिळेपर्यंत एका खोडाला ७० ते ८० रुपये खर्च येतो. रासायनिक    खतांचे भाव वाढल्याने खर्च वाढला आहे. म्हणून केळीवर केलेला खर्च व मिळालेला भाव यांचा ताळमेळ बसत नसल्यामुळे शेतकरी अधिकच कर्जबाजारी होत आहे.
              आठ-दहा दिवसांपूर्वी जयनगरसह परिसरात सतत तीन दिवसांच्या अवकाळी पावसामुळे परिपक्व झालेले केळीचे घड खाली पडल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.   त्यात दर कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यावर्षी बोंडअळीमुळे कापूस पिकातून जेमतेम भांडवल निघाले आहे. तसेच मिरची पिकावर लाखो रुपयांचा खर्च करून मिरचीचे संपूर्ण पीकच सुरुवातीला वाया गेले होते. म्हणून याची भरपाई केळी पिकातून निघेल अशा आशेवर शेतकरी होता. मात्र अवकाळी पावसामुळे परिपक्व झालेले केळीचे घड खाली पडल्यामुळे भरपूर माल खराब झाल्यामुळे तसेच भाव नसल्यामुळे  शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर कर्जाचा डोंगर कमी होण्याऐवजी वाढणारच आहे. म्हणून केळीच्या दराबाबत शासनाने शेतकऱ्यांना  चांगला दर मिळेल अशा योजना राबवाव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

केळीला मागणी अधिक असली तरी शेतकऱ्यांकडून मात्र प्रति क्विंटल ३०० ते ४५० रुपये एवढा कमी दर देऊन कापणी होत आहे. म्हणून सरासरी एक हजार ते १२०० रुपये प्रति क्विंटल दर व्यापाऱ्यांकडून मिळायला हवा. तेव्हाच खर्च वजा करून शेतकऱ्याला थोडाफार नफा मिळण्यास मदत होईल.
-हर्षल विकास पाटील, 
शेतकरी, जयनगर, ता. शहादा.

Web Title: Credit plan of Rs 1,500 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.