काटेरी हलव्याच्या दागीन्यांची क्रेझ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 12:23 IST2021-01-11T12:23:06+5:302021-01-11T12:23:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : काटेरी हलवा मकर संक्रांतीचा गोडवा वाढवितो. त्याच हलव्याचे दागिने देखील मन मोहून घेतात. मकरसंक्रांतीनिमित्त ...

काटेरी हलव्याच्या दागीन्यांची क्रेझ कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : काटेरी हलवा मकर संक्रांतीचा गोडवा वाढवितो. त्याच हलव्याचे दागिने देखील मन मोहून घेतात. मकरसंक्रांतीनिमित्त तयार करण्यात आलेल्या दागिन्यांची क्रेझ यंदाही कायम राहिली आहे. अनेक ठिकाणी अशा प्रकारचे दागिने विक्रीसाठी दाखल झाले आहेत. तसेच नंदुरबारात मोजकीच कुटुंब हे दागिने तयार करतात.
खास मकर संक्रांति साठी बनविण्यात येणारे काटेरी हलव्याचे दाण्यांचे दागिने महिला वर्गाची पहिली पसंती असते. पूर्वी या दागिन्यांची या भागात पाहिजेत अशी क्रेझ नव्हती मात्र गेल्या काही दिवसापासून या दागिन्यांची मागणी वाढू लागली आहे संक्रांतीला तिळगुळाच्या स्वरूपात दिला जाणारा काटेरी हलव्याच्या दाण्यांचा उपयोग करून दागिने तयार केले जातात.
प्रकार आणि आकार
महिलांचे सर्व प्रकारचे दागिने बनविण्यात येतात त्यात गळ्यातला हार, मंगळसूत्र, कानातील डूल, हातातील बांगड्या, अंगठी ,ब्रासलेट, कंमरपट्टा, चाळ,बिंदी,वेणीला लावण्यात येणारी माळ, यासह इतर दागिन्यांचा समावेश आहे लहान मुलांसाठी गळ्यातील हार, हातातील ब्रेसलेट, कमरपट्टा, डोक्यावर लावण्यासाठी टोप, व मोरपीस आदी दागिने तयार करण्यात आले आहेत, संक्रांतीच्या महिनाभर आधीपासूनच नोंदणी केल्यानंतर हे दागिने तयार केले जात असल्याने दागिने बनविणाऱ्या कारागिरांनी सांगितले .
किमती आवाक्यात
हलव्याच्या दाण्यांचे भाव जसे असतात त्या पद्धतीने या दागिन्यांच्या किमती ठरविल्या जातात यंदा हलव्याचे दाणे महाग असल्याने दागिन्यांच्या किमती काही प्रमाणात स्थिर ठेवण्यात आले आहे. हलव्याचे दागिने स्थानिक स्तरावर पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीत त्यामुळे रंगीत दाणे पुणे इंदोर जळगाव या भागातून मागवावे लागतात. रंगीत दाण्यामध्ये लाल, हिरवा, निळा, रंगाच्या दाण्यांची मागणी अधिक असते. पांढरे दाणे स्थानिक स्तरावर उपलब्ध होतात त्यामुळे त्याच्या किमती कमी असतात.
नववधूची पहिली संक्रांत सासरी राहिल्यास तिला अशा दागिन्यांनी संक्रांतीला सजविले जाते शिवाय काही महिला हौस म्हणून देखील संक्रांतीला दागिन्यांचा साज करीत असतात. महिलांप्रमाणेच आपल्या जीवनातील पहिली संक्रांत पाहणाऱ्या लहान बालकाला देखील हलव्याच्या दाण्यांच्या दागिन्यांनी सजविले जाते. यंदाही त्याची क्रेझ कायम आहे.