अपघातग्रस्त वाळूचा डंपर पोलिसांच्या ताब्यातून पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:21 IST2021-06-10T04:21:08+5:302021-06-10T04:21:08+5:30
शहादा-प्रकाशा रस्त्यावर डामरखेडानजीक वाळूने भरलेल्या डंपरने कारला धडक दिली. त्यामुळे कारचे नुकसान झाले होते. अपघातग्रस्त दोन्ही वाहने ही प्रकाशा ...

अपघातग्रस्त वाळूचा डंपर पोलिसांच्या ताब्यातून पळविला
शहादा-प्रकाशा रस्त्यावर डामरखेडानजीक वाळूने भरलेल्या डंपरने कारला धडक दिली. त्यामुळे कारचे नुकसान झाले होते. अपघातग्रस्त दोन्ही वाहने ही प्रकाशा औटपोस्टला उभी करण्यात आली होती. रात्री वाळूने भरलेला डंपर अचानक गायब झाला. पहाटे वाळू खाली करून तो पुन्हा जागेवर आणून उभा करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, कोळदा ते सेंधवा महामार्गाचे काम सुरू आहे. रस्ता ठेकेदाराचा डंपर (क्रमांक एमएच ३९-एडी ०१८०) ७ जून रोजी सकाळी दहा वाजता शहादाकडे जात असताना त्याला अपघात झाला होता. अपघातातील पती-पत्नी यांनी उपचारासाठी शहाद्याकडे धाव घेतली. दुसऱ्यादिवशी ८ जूनरोजी ते प्रकाशा औटपोस्टला आले असता, त्यांना डंपरमधील वाळू नसल्याचे दिसले. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जूनरोजी रात्री ठेकेदाराचा फौजीनामक व्यक्तींसह दोनजण औटपोस्टला आले. कर्मचारी जेवाणाला गेले असल्याची संधी साधून त्यांनी डंपर तेथून नेला. पोलिसांना कळताच त्यांनी शोध सुरू केला असता, प्रकाशा चौफुलीजवळ दिसला. त्यांनी तेथून डंपरला औटपोस्टला आणल्याचे सांगण्यात आले. पुढील तपास जमादार सुनील पाडवी, हवालदार रामा वळवी, पो का. विकास शिरसाठ, अजिद नागलोद करीत आहे.
दरम्यान, ठेकेदाराचा काँक्रिटीकरणाचा तात्पुरता प्रकल्प प्रकाशा येथे आहे. असे असताना डंपर वाळू भरून शहादाकडे का जात होता, हा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय थेट पोलिसांना न जुमानता डंपर घेऊन जाणे आणि वाळू खाली करून घेणे ही दबंगशाही कुणाच्या आशीर्वादाने ठेकेदाराने केली, याबाबतही चर्चा सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.