ई-पीक नोंदणी असेल तरच महामंडळ खरेदीकरणार शेतकऱ्यांकडून धान
By मनोज शेलार | Updated: September 14, 2023 19:06 IST2023-09-14T19:05:50+5:302023-09-14T19:06:14+5:30
आदिवासी विकास महामंडळाच्या नंदुरबार प्रादेशिक कार्यालयाचे व्यवस्थापक तुषार वाघ यांनी याबाबत माहिती दिली आहे.

ई-पीक नोंदणी असेल तरच महामंडळ खरेदीकरणार शेतकऱ्यांकडून धान
नंदुरबार : आदिवासी विकास महामंडळामार्फत धान अर्थात तांदूळ व भरडधान्याची खरेदी करण्यात येणार आहे. परंतु यासाठी ई-पीक नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी केली नसल्यास शेतकऱ्यांचा धान आणि भरडधान्य खरेदी करण्यास अडचणी येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आदिवासी विकास महामंडळाच्या नंदुरबार प्रादेशिक कार्यालयाचे व्यवस्थापक तुषार वाघ यांनी याबाबत माहिती दिली आहे. केंद्र सरकारच्या आधारभूत किमतीत खरेदी याेजनेत राज्य शासनाच्या माध्यमातून आदिवासी विकास महामंडळ धानाची व भरडधान्याची खरेदी करते. यासाठी शेतकऱ्यांनी शेतातील पिकाची ई-पीक पाहणी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी धान/ भरडधान्य पिकाची लागवड केली असेल त्या सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी प्रक्रियेद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास धान / भरडधान्य विक्रीला अडचणी निर्माण होऊ शकतात असे महामंडळाच्या नंदुरबार प्रादेशिक कार्यालयाने कळवले आहे.
यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी त्वरित ई-पीक पाहणीची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करवी. ई-पीक पाहणी प्रक्रियेसोबतच धान/ भरडधान्य विक्रीसाठी ज्या बँकेच्या खात्याची व्यवहारासाठी निवड करण्यात येईल, ते बँक खाते अद्ययावत ठेवावे. बँक खात्यासोबत आधार जोडणी प्रक्रिया पूर्ण करावी असे कळवण्यात आले आहे.