जिल्ह्यात कोरोनाचे द्विशतक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 12:06 IST2020-07-09T12:06:24+5:302020-07-09T12:06:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात २१ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झाला होता़ या ...

जिल्ह्यात कोरोनाचे द्विशतक
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात २१ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झाला होता़ या अहवालामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या २१६ एवढी झाली आहे़ एकाच रात्रीत कोरोनाने २०० रुग्णांचा टप्पा पार केल्याने रुग्ण संख्येचा वाढता वेग चिंतेची बाब ठरत आहे़ दरम्यान नंदुरबार शहरातील बागवान गल्लीतील एकाचा मृत्यू झाला आहे़
मंगळवारी रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयातील ३, मोहिदा ता़ शहादा आणि जनता पार्क नवापूर तर नंदुरबार शहरातील बागवान गल्ली, गांधीनगर,चौधरी गल्ली, नागाई नगर, लहान शहादे ता़ नंदुरबार येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, भाट गल्ली, आर्शिवाद कॉलनी, धर्मराज नगर, तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय, ज्ञानदीप सोसायटी, हुडको कॉलनी येथे प्रत्येकी एक तर देसाईपुरा व सहारा टाऊन येथे प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले आहेत़ रात्री उशिरा हे रुग्ण आढळून आल्यानंतर त्याठिकाणी संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती़
दरम्यान नंदुरबार शहर आणि तालुक्यात रुग्णांची संख्या आता १४१ झाली आहे़ त्याखालोखाल शहादा येथे ३८ रुग्णांची नोंद झाली आहे़ एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना मृत्यूच्या नोंदीी झाल्या आहेत़ जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे १० जणांचा मृत्यू झाला आहे़ मंगळवारी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या बागवान गल्लीतील ४५ वर्षीय पुरुषाला २ जुलै रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ त्याचा चार जुलै रोजी मृत्यू झाला होता़ मंगळवारी रात्री उशिरा त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़
शहरातील १६ पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील १० जणांना इन्स्टीट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे़ यात सहारा टाऊन येथील चार, गांधीनगर येथील ५ तर बागवान गल्लीतील मयताच्या पत्नीला क्वारंटाईन केले आहे़ बागवान गल्लीतील मयत पुरुष हा बाहेरगावी गेला होता किंवा कसे, याची माहिती आरोग्य विभाग घेत आहे़ इतर १५ ठिकाणच्या बाधितांचा पुणे, धुळे, शहादा यासह इतर ठिकाणी प्रवास झाल्याची माहिती आरोग्य विभागाला संबधितांनी दिली आहे़ त्यानुसार त्यांच्या संपर्कातील लक्षणे दिसून आलेल्यांना क्वारंटाईन केले गेले असून उर्वरित ५० च्या जवळपास नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे़ प्रशासनाने लहान शहादे येथील ५ जणांना क्वारंटाईन करुन याठिकाणी निर्जंतुकीकरण व फवारणी पूर्ण केली आहे़
जिल्ह्यात आढळलेल्या बहुतांश रुग्णांनी बाहेरगावी प्रवास करुन परत आल्यावर संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे़ प्रवास करणे गैर नसले तरी प्रवासादरम्यान आणि ज्याठिकाणी गेले आहोत त्याठिकाणी उपाययोजना न करता, नकळतपणे बाधितांच्या संपर्कात आल्याने जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे़ सोशल डिस्टन्सिंग, सॅनेटायझेशन, मास्क व हॅँडग्लोव्हजचा वापर न करणे आदी कारणांमुळेही हा फैलाव झाला असावा असे आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे़
२४ जूननंतर वाढला रुग्णांचा वेग
जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित एप्रिल महिन्यात आढळून आला होता़ त्यानंतर १३ जूनपर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा ५० झाला होता़ २४ जून रोजी १०० तर ६ जुलै पर्यंत आकडा २०० च्या पुढे गेला आहे़
जिल्ह्यात २४ जून ते ६ जुलै हा कालावधी सर्वाधिक घातक ठरला आहे़ सर्वाधिक १४१ रुग्ण संख्या ही नंदुरबार शहर व तालुक्यातील आहे़ यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे़ तर १०२ बरे झाले झाले आहेत़
शहादा येथे आजअखेरीस ३८ रुग्णांची नोंद आहे़ यातील १६ जण बरे झाले असून चौघांचा मृत्यू झाला आहे़
जिल्ह्यात २७ जून ते ६ जुलै या ११ दिवसांच्या काळात सर्वाधिक ५३ रुग्णांची नोंद झाली आहे़
तब्बल दोन महिने कोरोनामुक्त असलेल्या तळोदा तालुका आणि शहरात १८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे़ यातील १४ जण बरे झाले आहेत़ त्याखालोखाल अक्कलकुवा १५ तर नवापूर ३ आणि धडगाव तालुक्यात मंगळवारी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़