कोरोनाचा कोप, अंत्यसंस्कारावरच पालिकेचे १० लाख रुपये झाले खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST2021-06-09T04:38:13+5:302021-06-09T04:38:13+5:30
एका अंत्यविधीसाठी खर्च एक हजार १०० रुपये पालिकेकडून कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णासाठी ४०० रुपयांची लाकडे, ४५० रुपयांचे पाच लिटर ...

कोरोनाचा कोप, अंत्यसंस्कारावरच पालिकेचे १० लाख रुपये झाले खर्च
एका अंत्यविधीसाठी खर्च एक हजार १०० रुपये
पालिकेकडून कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णासाठी ४०० रुपयांची लाकडे, ४५० रुपयांचे पाच लिटर डिझेल, ३०० रुपयांचे कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट, असा १ हजार १०० रुपयांचा खर्च केला आहे.
मयताच्या दोन नातेवाइकांनाच या ठिकाणी प्रवेश देत अंत्यविधी केला गेला आहे. या दोघांना जिल्हा रुग्णालयाकडून दोन पीपीई किट दिले गेले होते. गरज पडल्यास पालिका कर्मचाऱ्यांनीही पीपीई किट दिल्याचे सांगण्यात आले.
पालिकेकडून अंत्यविधी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी चांगल्या दर्जाचे पीपीई किट खरेदी करून आणले होते.
स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांवर जबाबदारी
अंत्यविधीसाठी पालिकेडून एकूण सात कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. एप्रिल २०२० पासून कोविड नियमांचे पालन करूनच हे कर्मचारी अंत्यविधी व दफनविधी करून देत आहेत. नियमित हजर राहणाऱ्या या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी पालिकेकडून करून घेतली जात आहे. एका अंत्यविधीसाठी दोन ते तीन जण उपस्थित राहून प्रक्रिया पूर्ण करतात. जिल्ह्यात मृत्यूदर वाढला असल्याने एका दिवसात पाच ते सात अंत्यविधी पूर्ण केल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. यातून तासन्तास या कर्मचाऱ्यांनी येथेच सेवा दिली आहे.
दरम्यान, याबाबत अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. के.डी. सातपुते यांना संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या अंत्यविधीसाठी पीपीई किट देण्यात येतात. स्वच्छता कर्मचाऱ्यांना पीपीई किट दिले जाते. नातेवाइकांना मोफत पीपीई किट उपलब्ध करून दिले जातात. यासाठी कुठलीही रक्कम आकारत नाही.
नंदुरबार पालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी सांगितले की, पालिकेने सातत्याने अंत्यविधीसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. पालिकेने स्वच्छता विभागामार्फत मोफत अंत्यविधीसाठी परिश्रम घेतले आहेत. येत्या काळातही कोरोनाने बळी गेलेल्यांचे अंत्यविधी हे पालिकेच्या खर्चातून केले जातील.
पालिकेचे स्वच्छता निरीक्षक विशाल कामटी यांना संपर्क केला असता, ते म्हणाले की, दीड वर्षापासून पालिका मोफत अंत्यविधी करीत आहे. यासाठी सात कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्यांच्याकडून माहिती घेतली जाते. नियमित कामकाज सुरू आहे.