कोरोना पॅाझिटीव्हीटी दर आला २५ टक्केवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 12:18 IST2020-10-26T12:16:04+5:302020-10-26T12:18:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना पॅाझिटीव्हीटी दर कमालीचा घसरला आहे. सद्य स्थितीत स्वॅब संकलनही कमी झाले आहे. ...

कोरोना पॅाझिटीव्हीटी दर आला २५ टक्केवर
- लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना पॅाझिटीव्हीटी दर कमालीचा घसरला आहे. सद्य स्थितीत स्वॅब संकलनही कमी झाले आहे. त्यामुळे हा दर २४.८० टक्केपर्यंत आला आहे. तर मृत्यूदर हा २.४२ टक्केपर्यंत घसरला आहे. येत्या काळात पॅाझिटीव्हीटी दर आणखी कमी होणार असल्याचा अंदाज आरोग्य विभागातर्फे व्यक्त केला जात आहे.
जिल्ह्यात एप्रिल ते जून या दरम्यान कोरोना रुग्ण संख्या कमी होती. अर्थात या काळात स्वॅब संकलन आणि चाचण्यांची संख्या देखील कमी होती. त्यानंतर नंदुरबारात रॅपीड अण्टीजन चाचण्यांची व्यवस्था झाली. त्यानंतर आरटीपीसीआर चाचण्या सुरू झाल्या. त्यामुळे जुलै ते सप्टेंबर या काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढली. डब्लींगचा रेट हा २४ ते २८ दिवसांवर आला. पॅाझिटीव्हीटी दर देखील ५० टक्केपेक्षा अधीक होता. सद्य स्थितीत अर्थात ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून रुग्ण संख्या अचानक कमी झाली. अर्थात स्वॅब संकलन कमी झाले. त्यामुळे चाचण्या दररोज किमान १०० ते १५० पर्यंत होऊ लागल्या त्याचा परिणाम हा रुग्ण संख्या कमी होण्यावर झाला आहे. येत्या काळात हे प्रमाण कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.
माझे कुटूंब-माझी जबाबदारी या मोहिमेत मोठ्या संख्येने स्वॅब संकलन झाले होते. त्यामुळे या काळात पॅाझिटिव्ही दरही वाढला होता. आता तो कमी आहे.
जिल्ह्यात कोरोना पॅाझिटीव्हीटी दर कमी झाला आहे. त्याला विविध कारणे असली तरी कोरोनाबाबत नागरिकांमध्ये आलेली जनजागृती, वाढलेली प्रतीकारशक्ती हे देखील कारणीभूत आहे. रुग्ण कमी झाले म्हणजे कोरोना संपला असे नाही. यापुढील काळात देखील नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक ठरणार आहे.
-डाॅ.के.डी.सातपुते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक.