कोरोना रुग्णांना रुग्णवाहिकेची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 13:04 IST2020-07-11T13:04:19+5:302020-07-11T13:04:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने बाधित रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे. ...

Corona patients wait for an ambulance | कोरोना रुग्णांना रुग्णवाहिकेची प्रतीक्षा

कोरोना रुग्णांना रुग्णवाहिकेची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने बाधित रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे. विशेष म्हणजे रुग्ण बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित रुग्णाला मोहिदा येथील क्वारंटाईन कक्षात त्यांच्या नातेवाईकांनी पोहोचते करावे, अशी सक्ती आरोग्य विभागामार्फत केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गुरुवारी सायंकाळी उशिरा शहरातील दोन व तालुक्यातील तोरखेडा येथील एक अशा तीन महिलांचा कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल आल्यानंतर संबंधित तिन्ही महिलांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेद्वारे त्यांच्या घरून त्यांना नेणे गरजेचे असताना असे झाले नाही. याउलट आरोग्य विभागाने संबंधित बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना फोन करून सांगितले की, तुमच्या कुटुंबातील सदस्याचा अहवाल पॉझिटीव्ह आलेला आहे. त्यामुळे तुम्ही संबंधित रुग्णाला मोटारसायकलद्वारे मोहिदा येथील क्वारंटाईन सेंटरला पोहोचते करा, तेथून आम्ही त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करू, असा संदेश मिळाल्याने नातेवाईक हादरले असून त्यांनी स्वत: आपल्या कुटुंबातील बाधित रुग्णाला क्वारंटाईन सेंटरला दाखल केले. तेथेही रुग्णवाहिकेची सुमारे दोन ते अडीच तास वाट पाहिल्यानंतर रात्री १२ वाजेच्या सुमारास तिन्ही बाधित रुग्णांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक चौकशी केली असता मिळालेली माहिती अशी की, बाधित रुग्णांचा अहवाल आल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यासाठी क्वारंटाईन सेंटरच्या वैद्यकीय पथकाने तालुक्यातील म्हसावद, मंदाणे व सारंखेडा येथील १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांना फोनद्वारे माहिती दिली. मात्र आम्ही दहा मिनिटात पोहोचतो, अर्ध्या तासात पोहोचतो अशी उत्तरे रुग्णवाहिका चालकांकडून मिळाल्यानंतर आरोग्य विभाग हतबल झाला होता. विशेष म्हणजे वैद्यकीय पथकाने सुमारे दोन ते अडीच तास रुग्णवाहिकेची वाट पाहिली. रात्री उशिरा रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यानंतर बाधित रुग्णांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
शहरासह तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने क्वारंटाईन सेंटर येथे रुग्णवाहिका सज्ज ठेवणे गरजेचे आहे. मात्र असे होत नाही. मे महिन्यात वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने असाच प्रसंग उद्भवला होता. रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत संपूर्ण प्रशासन बाधित रुग्णाच्या घरासमोर थांबले होते. जिल्हा प्रशासनाने किमान शहादा येथील क्वारंटाईन सेंटरला रुग्णवाहिका सज्ज ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शहादा तालुक्यातील ५० जणांचे अहवाल प्रतीक्षेत असून आज ११ नमुने संकलित केले.
पतंजलीनगर आणि मुलब्रिजनगर हे नवीन कंटेनमेंट झोन आहेत.
हिंगणी येथील बाधित रुग्णाच्या अतिसंपर्कातील सर्व १२ व्यक्तींच्या शेवटच्या दोन अहवालांमध्ये निगेटीव्ह अहवाल आले आहेत.
तालुक्यातील मंदाणे गाव व परिसर नव्याने कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे.

Web Title: Corona patients wait for an ambulance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.