भूषण रामराजे।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात कोरोनामुक्त रूग्णांची संख्या वाढत आहे. पाच शासकीय आणि ९ खाजगी कोविड सेंटर्समध्ये आजघडीला १८६ रूग्ण उपचार घेत असून ८०८ बेड रिकामे आहेत.कोरोनामुक्त रुग्ण वाढत असताना दररोज तालुकानिहाय घेण्यात येणायार् स्वॅबची पॉझिटिव्हीटी रेट १०.१ एवढा आहे. रुग्णांसाठी गरजेचे असलेले सर्वाधिक व्हेंटीलेटर बेड जिल्हा रुग्णालयात आहेत. येथील १४० बेड पैकी २० बेड हे व्हेंटीलेटर युक्त आहेत. उर्वरीत १२० बेड हे ऑक्सिजन सिलींडरसह आहेत. नवापूर, शहादा, सलसाडी आणि एकलव्य स्कूलमधील कोविड कक्षात एकूण ४९० बेड उपलब्ध आहेत. यातील ६० बेडवरच सध्या पेशंट असून नवापूर आणि सलसाडी रुग्णच नसल्याची नोंद आहे. जिल्हा रुग्णालय वगळता इतर चारही शासकीय कोविड सेंटरमध्ये व्हेंटीलेटर्स नाहीत. ऑक्सिजनबेड मात्र तयार करण्यात आले आहेत.
खाजगी कोविड सेंटरसाठी दिवसाला ३० हजार रूपयांपर्यंत खर्च येत आहे. सध्या एक खाजगी सेंटर बंद होण्याच्या मार्गावर असून आठ ठिकाणी मोजकेच रुग्ण असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
जिल्ह्यात पाच शासकीय तर ९ खाजगी कोविड सेंटर्स मिळून ९९४ बेड्स आहेत. यापैकी १८६ बेडवर सध्या रुग्ण असून ८०८ बेड रिकामे आहेत. ९ खाजगी कोविड सेंटर मध्ये प्रत्येकी चार बेड हे व्हेंटीलेटरसह तर उर्वरीत बेड हे ऑक्सिजन सह आहेत. या ९ सेंटर्स मध्ये एकूण ३६४ बेडपैकी २८० बेड आजघडीस रिक्त आहेत. येथे एकूण८४ बेडवर रुग्ण आहेत. यात गंभीर रुग्णांची नोंद नाही.
सध्या कोविड सेंटरमध्ये केवळ चार रुग्ण आहेत. कोविड सेंटरसाठीचा खर्च मोठा असतो. यात प्रामुख्याने औषध आणि ऑक्सिजन साठा करुन ठेवणे गरजेचे आहे. रुग्णालयात ३० बेडची क्षमता आहे. आतापर्यंत सर्वच रुग्ण बरे होवून गेेले आहेत. रुग्णालयात आजवर एकही मृत्यू झालेला नाही. डाॅक्टर्स आणि इतर स्टाफचा खर्च मोठा असल्याने काहीअंशी अडचणी येत आहेत. डाॅ.भूपेंद्र प्रकाश पाटील, निम्स समृद्धी कोविड सेंटर, नंदुरबार.
जिल्ह्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाणे हे कमी झाले आहे. त्यातही गंभीर रुग्णसंख्या कमी झाली आहे. यातून मृत्यूदरही कमी झाला आहे. तूर्तास जिल्हा रुग्णालयात २० व्हेंटीलेटर बेड आहेत. हे बेड पुरेसे आहेत. -डाॅ. के.डी.सातपुते, अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक,
घटलेली रुग्ण संख्या हे चांगले लक्षण आहे. परंतू नागरीकांनी काळजी घ्यावी. कोविड सेंटर्सचा खर्च हा अधिक असल्या कारणाने काही सेंटर्स येत्या काळात नाईलाजाने बंद करावे लागतील. - डाॅ. राजेश वळवी, अध्यक्ष, आदिवासी डाॅक्टर्स असो. नंदुरबार.