कोरोना रुग्ण डबलींगचा रेट आला २२ दिवसांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 21:18 IST2020-09-20T21:18:34+5:302020-09-20T21:18:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या साडेचार हजाराच्या घरात गेली आहे. मृत्यू देखील १०० पेक्षा अधीक ...

कोरोना रुग्ण डबलींगचा रेट आला २२ दिवसांवर
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या साडेचार हजाराच्या घरात गेली आहे. मृत्यू देखील १०० पेक्षा अधीक गेले आहेत. दररोज ८० ते १०० रुग्ण आढळून येत आहेत. असे असले तरी जिल्ह्यात डबलींगचा रेट हा २२ ते २५ दिवसांवर आहे. शिवाय संसर्गाचे प्रमाण देखील ३० ते ३५ टक्के आहे. डबलींचा रेट आणखी जास्त दिवसांवर जावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, जिल्ह्यात मृत्यूदर हा २.४२ पर्यंत खाली आला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढतच चालला आहे. शहरी भागासह ग्रामिण भागात देखील प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे आणि भितीचे वातावरण आहे. सद्य स्थितीत जिल्ह्यात बाधितांची संख्या ही साडेचार हजारापर्यंत पोहचली आहे. येत्या काळात ती अधीक वाढण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने प्रशासनही सज्ज झाले आहे. शासकीय कोविड उपचार कक्षांमधील खाटांची संख्या वाढविण्यात येत आहे. शिवाय उपचार करणाऱ्या खाजगी रुग्णालयांना देखील परवानगी दिली जात आहे. सद्य स्थितीत सात खाजगी रुग्णालये सुरू असून आणखी दोन जणांना लवकरच परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
रुग्ण डबलींगचे प्रमाण
रुग्ण डबलींचे प्रमाण जिल्ह्यात २२ ते २५ दिवसांवर आले आहे. पूर्वी हेच प्रमाण ४५ ते ६० दिवसांवर होते. परंतु आॅगस्ट आणि सप्टेबर महिन्यात आढळलेल्या रुग्ण संख्येचे प्रमाण पहाता हा रेट २२ दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या काळात रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास प्रमाण आणखी खाली येऊन ते १५ ते २० दिवसांवर येण्याची भिती देखील व्यक्त होत आहे.
संसर्गाचे प्रमाण
जिल्ह्यात संसर्गाचे प्रमाण हे ३० ते ३५ टक्के आहे. अर्थात १०० रुग्णांचे स्वॅब तपासणीनंतर त्यातून ३० ते ३५ रुग्ण बाधीत आढळून येत आहेत. येथील आरटीपीसीआर लॅबमध्ये दररोज किमान २५० ते ३०० जणांचे स्वॅब तपासून अहवाल दिला जातो. एका शिफ्टमध्ये ९४ स्वॅब तपासले जातात. दिवसभरात साधारणत: तीन शिफ्ट केले जातात. त्यामुळे सरासरी १०० मधून ३० ते ३५ अहवाल पॉझिटिव्ह असतात. अर्थात एका ९४ च्या बॅचमध्ये १८ ते ४६ पर्यंत बाधीतांची संख्या आढळून येते.
मृत्यूदर मात्र झाला कमी
जिल्ह्यात मृत्यूदर मात्र कमी झाला आहे. सद्य स्थितीत जिल्ह्यात १०८ जणांचा मृत्य झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने मृत्यूदर कमी झाल्याचे दिसून येत आहे. पूर्वी कोरोना रुग्ण संख्या कमी होती त्यामुळे मृत्यूदर हा तब्बल पाच ते आठ टक्केपर्यंत जात होता. आता मात्र तो अडीच टक्क्याच्या आतच आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे ५० ते ८० वयोगटातील आहेत.
गेल्या महिन्यापासून स्वॅब तपासणीची संख्या वाढविण्यात आली आहे. दररोज किमान ३०० स्वॅब संकलीत केले जात आहेत. ते ५०० पर्यंत वाढविण्यच्या सुचना आधीच विभागीय आयुक्त यांनी दिल्या आहेत. त्यामुळे धडगाव व अक्कलकुवा वगळता सर्वच तालुकास्तरावर स्वॅब संकलन होत आहे काही ठिकाणी फिरते पथक देखील स्वॅब संकलन करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत.