कोरोनाच्या डेल्टा प्लसची जिल्ह्याला चिंता नाहीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:22 IST2021-06-25T04:22:13+5:302021-06-25T04:22:13+5:30
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होऊन उपचार घेणारे रुग्णही बरे ...

कोरोनाच्या डेल्टा प्लसची जिल्ह्याला चिंता नाहीच!
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होऊन उपचार घेणारे रुग्णही बरे होऊन घरी जात आहेत. मृतांची संख्याही शून्यावर आली आहे. जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असताना नजीकच्या जळगाव जिल्ह्यात आढळून आलेल्या डेल्टा प्लस व्हेरिअंटमुळे चिंता वाढत आहेत. परंतु, नंदुरबार जिल्ह्यात मात्र या चिंता करण्याची आवश्यकताच नसल्याचे आरोग्य विभाग सांगत आहे.
आरोग्य विभागाचा हा दावा ९० टक्के खरा असल्याचे जिल्ह्यात सध्या उपलब्ध उपाययोजना आणि सुरू असलेले लसीकरण यावरून दिसून येत आहे. लस घेतलेल्यांना डेल्टा व्हेरिअंटचा धोका नसल्याने लसीकरण वाढविण्यात आले आहे. १८ पासून पुढे सर्व वयोगटांत लस दिली जात आहे. जिल्ह्यात आजअखेरीस चार लाखांच्या लसींचे डोस नागरिकांना टाेचून झाले आहेत. सोबत ऑक्सिजन प्लांट, वाढीव बेड आणि औषधींचा साठा असल्याने चिंता करण्याचे कारण नसल्याचे आरोग्य विभाग सांगत आहे.
दर दिवशी एक हजार नागरिकांच्या टेस्ट
जिल्ह्यात सध्या दर दिवशी एक हजाराच्या जवळपास नागरिकांचे स्वॅब कलेक्ट करून तपासणी होत आहे. स्वॅबचा रिपोर्ट तातडीने दिला जात आहे.
यातून रुग्णांची संख्या एक अंकी संख्येत येत आहे. नागरिकांना स्वॅब देता यावे, यासाठी जागोजागी स्वॅब संकलन केंद्र आहेत. सोबत रॅपिड टेस्टही केल्या जातात.
नव्याने आढळलेला डेल्टा प्लस व्हेरिअंट हा कोरोना विषाणूतील सुधारित आवृत्ती आहे. परंतु, हा म्यूटेट विषाणू बरा होत असल्याचे समोर आले आहे. जळगावातील रुग्ण बरे होऊन सुखरूप घरी गेले आहेत.
तरीही जिल्ह्यात खबरदारीचे उपाय
n जिल्ह्यात येणाऱ्या प्रवासी वाहनांची तपासणी सध्या बंद असली तरी रेल्वेतून येणाऱ्यांची तपासणी अद्यापही केली जात आहे.
n जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनात जिल्हा शल्यचिकित्सक, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून कोरोना रुग्णांच्या उपचारांचा आढावा घेत नियोजन केले जात आहे. जिल्हा रुग्णालयात अधिकाधिक तज्ञ आणि प्रशिक्षित डाॅक्टरांना सेवा देण्यासाठी आमंत्रित केले जात आहे, यात काही येथे येऊ लागले आहेत.