शहादा शहर व तालुक्यात कोरोनाचा विस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:32 IST2021-04-02T04:32:00+5:302021-04-02T04:32:00+5:30

मार्च महिन्यापासून शहरासह तालुक्यातील मंदाणे, डोंगरगाव, कोंढावळ, म्हसावद या गावांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दररोजचे ...

Corona blast in Shahada city and taluka | शहादा शहर व तालुक्यात कोरोनाचा विस्फोट

शहादा शहर व तालुक्यात कोरोनाचा विस्फोट

मार्च महिन्यापासून शहरासह तालुक्यातील मंदाणे, डोंगरगाव, कोंढावळ, म्हसावद या गावांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दररोजचे आकडे पाहता हा कोरोना संक्रमणाचा विस्फोट झाला असून कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला अपयश आल्याचे सिद्ध होत आहे. प्रशासनातर्फे १ एप्रिलपासून सकाळी सात ते दुपारी एक या कालावधीत किराणा दुकान व भाजीपाला विक्रीला परवानगी दिली आहे. उर्वरित कालावधीत संचारबंदी जारी करण्यात आली असून गुरुवारी पहिल्या दिवशी दुपारी एक वाजल्यानंतर शहरात पोलिसांनी बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर व मुदतीनंतर व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केल्याने संपूर्ण शहरात शुकशुकाट होता.

शासकीय पातळीवर आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याने शहरातील सर्व खासगी हॉस्पिटल फुल्ल झाले असून अनेक रुग्णालयात ‘बेड उपलब्ध नाही’ असे बोर्ड लावल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अतिगंभीर रुग्णांनी गुजरात राज्यातील सुरत येथे उपचारासाठी दाखल होणे पसंत केले आहे. गेल्या आठ दिवसांत सुरतमधील अनेक हॉस्पिटलमध्ये शहरासह तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक झाली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी शासकीय पातळीवर ऑक्सिजनयुक्त बेडची सुविधा अद्यापही उपलब्ध झालेली नसल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या तारखेपासून परिस्थिती गंभीर झालेली असतानाही शासकीय पातळीवर आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले गेले नसल्याने नागरिकांना बाधितांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयांवर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळै अनेकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

प्रशासनातर्फे चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असली तरी कोरोना संक्रमणाच्या या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आढळून येत असल्याने हा नेमका कोणता कोरोना संक्रमणाचा स्ट्रेन आहे याचा शोध घेतला गेला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. केवळ चाचण्यांची संख्या वाढवून संक्रमणाला थांबविणे शक्य होणार नाही तर यासाठी युद्धपातळीवर विशेष मोहीम बाधित रुग्ण आढळून येत असलेल्या गावांमध्ये, भागांमध्ये राबविण्यासाठी प्रशासनाने नियोजनबद्धरित्या कार्यक्रम राबविण्याची गरज आहे,असे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. गेल्यावर्षीचा अनुभव पाहता बाधित रुग्ण आढळून येत असले तरी मृत्यूची संख्याही आवाक्यात होती. तर कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय होती. मात्र, मार्च २०२१ मध्ये बाधितांची संख्या वाढण्यासह या आजारामुळे मृत्यू पावणार्‍यांची संख्याही कमालीची वाढली आहे. प्रशासनाने या गोष्टीचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

गेल्या १५ दिवसांत शहादा शहरातील अमरधाम येथे ६० पेक्षा अधिक मृतांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर दफनविधी करण्यात आलेल्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या मृतांमध्ये अनेक कोरोना बाधित रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांवरही अमरधाम येथे नियमांचे पालन करून अंत्यसंस्कार केले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध नसल्याने अमरधामला वेटींग सुरू होती. अमरधाममधील कर्मचारी प्रताप ठाकूर व इतरांनी मृतांवर अंत्यसंस्काराचे कार्य अहोरात्र पार पाडले. अचानक मोठ्या संख्येने नागरिक मृत्युमुखी पडत असून यात इतर आजाराने व वृद्धापकाळाने मृत्यू पावलेल्यांचाही समावेश आहे.

दिवसभर रुग्णवाहिकांच्या सायरनच्या आवाजाने नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली असल्याने आता प्रशासनाने आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासह कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. संचारबंदीच्या कालावधीत आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला पाहिजे. शासकीय आरोग्य यंत्रणा सक्षम झाली तर याचा दिलासा सर्वसामान्य नागरिकांना होणार असून याकडे आता गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.

Web Title: Corona blast in Shahada city and taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.