होळतर्फे हवेली शाळेतील २१ विद्यार्थिनींना कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:34 IST2021-03-09T04:34:38+5:302021-03-09T04:34:38+5:30
नंदुरबार : शहरातील होळतर्फे हवेली भागात असलेल्या सरकारी मुलींच्या निवासी शाळेतील २१ विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. ...

होळतर्फे हवेली शाळेतील २१ विद्यार्थिनींना कोरोना
नंदुरबार : शहरातील होळतर्फे हवेली भागात असलेल्या सरकारी मुलींच्या निवासी शाळेतील २१ विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे शाळेत शुकशुकाट निर्माण झाला असून पालकवर्ग चिंतेत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे. ज्या शाळांमधील शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी पॅाझिटिव्ह येत आहेत त्या शाळांना तीन ते पाच दिवस सुट्टी द्यावी लागत आहे.
नंदुरबारातील होळतर्फे हवेली शिवारात असलेल्या शासकीय मुलींच्या निवासी शाळेत उपस्थितीत विद्यार्थिनींपैकी तब्बल २१ विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. सर्वच विद्यार्थिनी या १४ ते २० वयोगटातील आहेत. त्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे.
जिल्ह्यात शाळा सुरू झाल्यानंतर एखाद्या शाळेतील एकाच वेळी एवढ्या संख्येने विद्यार्थी पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण पहिल्यांदाच आढळल्याने खळबळ उडाली आहे. शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.