पुलाच्या बांधकामाची गुणवत्ता नियंत्रण पथकाकडून तपासणी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:40 IST2021-06-16T04:40:28+5:302021-06-16T04:40:28+5:30
विसरवाडी-खेतिया या महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील कोळदा ते खेतिया या रस्त्याचे बांधकाम खासगी मक्तेदाराकडून केले जात आहेत. याच रस्त्यावर प्रकाशा ...

पुलाच्या बांधकामाची गुणवत्ता नियंत्रण पथकाकडून तपासणी करावी
विसरवाडी-खेतिया या महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील कोळदा ते खेतिया या रस्त्याचे बांधकाम खासगी मक्तेदाराकडून केले जात आहेत. याच रस्त्यावर प्रकाशा येथील केदारेश्वर येथे तापी नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून हे बांधकाम सुरू असून निर्माणाधीन पुलाच्या एका पिलरचा काही भाग अचानक सोमवारी निखळून पडल्याने या पुलाच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नवीन पुलाची निर्मिती करण्यात येत असली तरी बांधकामाचा दर्जा योग्य नसल्याने निर्माणाधीन अवस्थेतच पिलरला भगदाड पडत असल्याने इतर पिलरची काय अवस्था असेल याबाबत न बोललेलेच बरे. विशेष म्हणजे किमान १०० वर्षे या पुलाचे आयुष्यमान असेल असा करार बांधकाम विभाग व ठेकेदार या दोघांदरम्यान झाला असल्याने व भविष्यात मोठ्या प्रमाणात या पुलावरून अवजड वाहतूक होणार असल्याने वाहनांची संख्या लक्षात घेता या पुलाचे मजबुतीकरण योग्य आहे किंवा नाही याबाबत आत्ताच विशेष खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात निकृष्ट बांधकामामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.