दुसरा डोस घेणाऱ्यांना दिलासा, ३७ हजार लसींचा साठा झाला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:50 IST2021-05-05T04:50:18+5:302021-05-05T04:50:18+5:30

नंदुरबार : पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठी गेलेल्या अनेकांना कोविशिल्ड व्हॅक्सिन न मिळाल्याचे दावे मंगळवारी होत होते. यातून ...

Consolation to those who took the second dose, stock of 37 thousand vaccines was sent | दुसरा डोस घेणाऱ्यांना दिलासा, ३७ हजार लसींचा साठा झाला रवाना

दुसरा डोस घेणाऱ्यांना दिलासा, ३७ हजार लसींचा साठा झाला रवाना

नंदुरबार : पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठी गेलेल्या अनेकांना कोविशिल्ड व्हॅक्सिन न मिळाल्याचे दावे मंगळवारी होत होते. यातून लस टंचाई असल्याचे चित्र निर्माण झाले होते. परंतु यावर जिल्हा प्रशासनाने मात केली असून येत्या २४ तासात जिल्ह्यात एकूण ३७ हजार लसींचा साठा प्राप्त होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून जिल्ह्यात २० हजार डोस मंगळवारी उपलब्ध होते.

जिल्ह्यातील एक हजार २३ नागरिकांनी सोमवारीअखेरपर्यंत पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे. यातून जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी सुधारली आहे. नोंदणी केलेल्या २२ हजारांपेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात १२६ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ज्येष्ठ नागरिक, ४५ ते ६०, १८ वर्षावरील या गटांचे लसीकरण वेगात सुरू असून जिल्ह्यात ४५ ठिकाणी लसीकरणाची सोय असल्याने नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आरोग्य विभाग सांगत आहे. बुधवारी लसींचा साठा येणार असल्याने गुरुवारपासून जिल्ह्यात लसींचा तुटवडा जाणवणार नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. एन. डी. बोडके यांनी स्पष्ट केले आहे.

दुसरा डोस घेणारांना सर्वाधिक दिलासा

जिल्ह्यात लसीकरणासाठी जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही सोय करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात अद्याप २० हजार ३५० कोविशिल्डचे डोस उपलब्ध आहेत. यात बुधवारी २४ हजार ९०० डोस मिळणार असल्याने ही संख्या ५४ हजारांपेक्षा अधिक होणार आहे. दरम्यान १२ हजार कोव्हॅक्सिनचे डोसही मिळणार असल्याने दोन्ही लसींचा कोटा पूर्ण होणार आहे. यामुळे मे महिन्यात लसीकरणाचा टक्का वाढेल असा अंदाज आहे.

आरोग्य विभागाने जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात दिलेल्या कोव्हॅक्सिनचे डोस मंगळवारी संपल्याचे सांगण्यात आले आहे. याठिकाणी बुधवारी तातडीने डोस देऊन लसीकरणाला वेग दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांच्या केंद्रांमध्ये नोंदणीही वाढली आहे.

सोमवारी व मंगळवारी कोव्हॅक्सिन उपलब्ध नसल्याने अनेक जण परत गेल्याचे सांगण्यात आले आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस साधारण चार आठवड्याने तर कोविशिल्ड सहा आठवड्याच्या अंतराने घेण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे अनेक जण चिंतेत आहेत. परंतु काही दिवसांचे अंतर झाल्यावरही दुसरा डोस घेतल्यास काहीच अडचण नसल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: Consolation to those who took the second dose, stock of 37 thousand vaccines was sent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.