शिवभोजन थाळीमुळे दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:29 IST2021-04-18T04:29:45+5:302021-04-18T04:29:45+5:30

दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. संचारबंदीच्या कालावधीत सर्व कामधंदे बंद असून ...

Consolation due to Shivbhojan plate | शिवभोजन थाळीमुळे दिलासा

शिवभोजन थाळीमुळे दिलासा

दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. संचारबंदीच्या कालावधीत सर्व कामधंदे बंद असून जनजीवन ठप्प झाले आहे. रोजगार बंद झाल्याने आता खायचे काय? अशी परिस्थिती निर्माण झाली असताना शिवभोजन केंद्रांवर मोफत भोजन गरीब व कष्टकऱ्यांसाठी महत्त्वाचा आधार ठरत आहे. अशा संकटाच्या काळात मजूर, कष्टकरी, निराधार, बेघर, गरीब असणाऱ्या अनेकांसाठी राज्य सरकारची शिवभोजन थाळी योजना आधार देणारी ठरत असल्याचे मत लाभार्थ्यांकडून व्यक्त केले जात आहे.

संचारबंदीच्या काळात हाताला काम नसलेला एक मोठा वर्ग आहे. अशा गरजू कुटुंबांसाठी शिवभोजन थाळी उपयोगी पडत आहे. ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे, ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रीत, निराधार, मजूर, बेघर अवस्थेत असणाऱ्या नागरिकांच्या रोजच्या जेवणाची सोय या माध्यमातून उपलब्ध झाली असल्याने लॉकडाऊनमुळे कामधंदा गमावला असला तरी या कालावधीत कोरोना विषाणू संक्रमणाचे संकट दूर व्हावे, पूर्वीसारखे जनजीवन सुरळीत व्हावे व मानव जातीचे संरक्षण व्हावे अशी प्रार्थना कष्टकरी कुटुंबीयांकडून व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक शिवभोजन केंद्रावर कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करण्यात येत असून पार्सल स्वरूपात शिवभोजन दिले जात आहे. या केंद्रावर येणाऱ्या प्रत्येकाच्या शरीरातील तापमानाची मोजणी केली जात असून सॅनिटायझरने हात धुतल्यानंतर लाभार्थ्यांना शिवभोजन मोफत देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांनी आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण करून घ्यावे. लसीकरणामुळे कोरोनापासून बचाव होण्यास मदत मिळते याबाबत जनजागृती केली जात आहे.

संचारबंदीमुळे कामधंदा बुडाला. टॅक्सी चालवून रोजगार मिळायचा. मात्र प्रवाशी अभावी टॅक्सी बंद आहे. अशाप्रसंगी शिवभोजन केंद्रावर मोफत मिळणारे भोजन महत्त्वाचा आधार ठरत आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे काही दिवसासाठीचा रोटीचा प्रश्न सुटला आहे.

-दीपक गुरव, टॅक्सी चालक, शहादा

शहरात कोरोना विषाणू संक्रमणामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. चार-पाच घरांची धुणीभांडी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा . मात्र आता काही दिवसापासून कामधंदा बंद आहे. परिणामी आता पोट भरायचे कसे ही चिंता सतावत होती. अशा काळात शिवभोजन केंद्राची माहिती मिळाली, तेथे चांगल्या दर्जाचे भोजन मिळाले. यामुळे माझ्यासह कुटुंबीयांची काही दिवसाची चिंता मिटली आहे.

-सोनीबाई पवार, शहादा

लॉकडाऊनमुळे व्यवहार ठप्प झाले आहेत. अशा काळात गरीब कष्टकऱ्यांना हक्काचे भोजन मिळावे यासाठी राज्य शासनाने शिवभोजन केंद्रावरून मोफत भोजनाची व्यवस्था केल्याने याचा लाभ सर्वसामान्य गरीब जनतेला होत आहे. असा उपक्रम राबवून शासनाने कष्टकऱ्यांना संकट समयी मोठा आधार दिला आहे.

-दिनेश महाजन, चहा विक्रेता, शहादा

Web Title: Consolation due to Shivbhojan plate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.